मुंबईच्या गोलंदाजांकडे लक्ष; गुजरात टायटन्सविरुद्ध अर्जुनला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईला शनिवारी वानखेडेवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून १३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
मुंबईच्या गोलंदाजांकडे लक्ष; गुजरात टायटन्सविरुद्ध अर्जुनला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी सर्वाधिक पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि गतविजेते गुजरात टायटन्स हे दोन संघ आमनेसामने येतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत प्रामुख्याने मुंबईचे गोलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. त्याशिवाय अर्जुन तेंडुलकरला गेल्या सामन्यातील सुमार कामगिरीनंतर आणखी एक संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईला शनिवारी वानखेडेवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. या लढतीत डावखुरा मध्यमगती गोलंदाज अर्जुनने एकाच षटकात ३१ धावा दिल्या व सामन्याला कलाटणी मिळाली. त्याशिवाय जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ यांनाही ‘डेथ ओव्हर्स’मध्ये अपेक्षेनुसार गोलंदाजी करता आली नाही. अहमदाबादच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांची आतषबाजी झाल्याचे पहावयास मिळाले असल्याने मुंबई गोलंदाजांच्या फळीत बदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईने सहापैकी तीन लढती जिंकल्या आहेत, तर तीन गमावल्या आहेत.

दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने सहापैकी चार लढती जिंकून जेतेपद राखण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विशेषत: गेल्या सामन्यात गुजरातने लखनऊविरुद्ध त्यांच्याच मैदानात अशक्यप्राय विजय मिळवला. त्यांनी धावांचा बचाव करताना यंदाच्या हंगामात प्रथमच सामना जिंकला. परंतु घरच्या मैदानावर आतापर्यंत झालेल्या तीनपैकी दोन लढती गुजरातने गमावल्या आहेत. त्यामुळे गुजरातचे खेळाडू कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सूर्यकुमारमुळे मुंबईची फलंदाजी स्थिर

सूर्यकुमार यादवने गेल्या सामन्यात २६ चेंडूंत ५७ धावा फटकावत फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणारा सूर्यकुमार छाप पाडण्यास उत्सुक आहे. रोहित, इशान किशनही पॉवरप्लेमध्ये उत्तम प्रारंभ करत आहे. कॅमेरून ग्रीन मुंबईसाठी अष्टपैलू योगदान देत आहे. तिलक वर्मा व टिम डेव्हिड कोणत्याही क्षणी फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. मात्र मुंबईला गोलंदाजीत प्रामुख्याने लेगस्पिनर पियुष चावलावर अवलंबून राहावे लागेल.

गुजरातचे गोलंदाज लयीत

मोहित शर्मा, मोहम्मद शमी, राशिद खान या त्रिकुटामुळे गुजरातची गोलंदाजी प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरत आहे. त्याशिवाय चायनामन फिरकीपटू नूर अहमद आणि हार्दिकही उपयुक्त योगदान देत आहे. हार्दिकला फलंदाजीतही लय गवसल्याने गुजरातची चिंता कमी झाली आहे. शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर गेल्या लढतीतील अपयश बाजूला सारून पुन्हा कामगिरी उंचावतील, अशी गुजरातच्या चाहत्यांना अपेक्षा असेल.

अर्जुनने आतापर्यंतच्या तीन आयपीएल सामन्यांत दोन बळी मिळवताना १०.६०च्या सरासरीने ८३ धावा लुटल्या आहेत. यांपैकी पंजाबविरुद्ध त्याने ३ षटकांतच ४८ धावा दिल्या. मुंबई-गुजरात यांच्यात फक्त एकच आयपीएल लढत झाली असून गतवर्षी झालेल्या त्या सामन्यात मुंबईने ५ धावांनी सरशी साधली होती.

संभाव्य संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टिम डेव्हिड, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर.

गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in