चेन्नईमध्ये ऋतु‘राज’ ! महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदावरून पायउतार

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शुक्रवारी रंगणाऱ्या आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्याआधी इंडियन प्रीमियर लीगकडून याबाबतची घोषणा करण्यात आली.
चेन्नईमध्ये ऋतु‘राज’ ! महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदावरून पायउतार

चेन्नई : एका दशकापेक्षा जास्त काळ चेन्नई सुपर किंग्जशी घट्ट नाळ जुळलेला महान खेळाडू तसेच एक-दोन नव्हे तर तब्बल पाच विजेतेपदे मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आता चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्वाची धुरा मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली आहेत. धोनीच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला असला तरी पुढील वर्षी मात्र धोनी आयपीएलमध्ये नसणार, याचे संकेत आता मिळू लागले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शुक्रवारी रंगणाऱ्या आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्याआधी इंडियन प्रीमियर लीगकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने निवेदन सादर करून याबाबत स्पष्टीकरण दिले. “महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०२४ मोसमाच्या सुरुवातीलाच चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ऋतुराज हा चेन्नईचा प्रमुख घटक असून २०१९पासून त्याने ५२ सामन्यांत चेन्नईचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आता आगामी मोसमात चेन्नईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे,” असे या निवेदनात म्हटले आहे.

धोनी या मोसमाअखेरीस निवृत्त होणार, अशी चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे चेन्नईचे हे स्थित्यंतर अगदी सोपे जावे, यासाठीच धोनीच्या उपस्थितीतच युवा खेळाडूकडे संघाची कमान सोपवण्याचा निर्णय फ्रँचायझींनी घेतला आहे. भारताकडून ६ वनडे आणि १९ टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व करणाऱ्या ऋतुराजने २०२०च्या मोसमात चेन्नईकडून पदार्पण केले. “धोनीने आतापर्यंत जे काही केले ते संघाच्या भल्यासाठीच केले. कर्णधारांची बैठक होण्याआधीच मला त्याच्या निर्णयाची कल्पना होती. त्यामुळे आम्ही धोनीच्या निर्णयाचा आदर करत आहोत,” असे चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले.

गेल्या मोसमात ऋतुराजचा बोलबाला राहिला होता. त्याने १६ सामन्यांत १४७.५०च्या सरासरीने ५९० धावा फटकावल्या होत्या. २०२१च्या मोसमात त्याने १६ सामन्यांत सर्वाधिक ६३५ धावा रचल्या होत्या. महाराष्ट्राच्या या २७ वर्षीय खेळाडूने याआधीही कर्णधारपदाची धुरा सांभाळली असून गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळत होता.

महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचे २५० सामने खेळला असून १३५.९२च्या सरासरीने ५ हजारपेक्षा जास्त धावा कुटल्या आहेत. गेल्या मोसमात गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनीने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणे पसंत केले होते. पण यावर्षी धोनी पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याच्याकडून चेन्नईला दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. धोनीने चेन्नईला पाच वेळा आयपीएलचे तर दोन वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल १० वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.

धोनीच्या निर्णयावर इरफान पठाण फिदा

भारताचा महान खेळाडू महेंद्रसिंह धोनीने आपल्याकडील नेतृत्व युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यामुळे त्याच्या या निर्णयावर भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण फिदा झाला आहे. “क्रिकेटच्या सतत विस्तारणाऱ्या आकाशगंगेत, महेंद्रसिंह धोनीचा नेतृत्वाचा वारसा लख्खपणे चमकतो. धोनीचे नेतृत्व पुढील काही दशके सर्वांच्या स्मरणात राहील. आता नवीन कर्णधार ऋतुराजला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा,” असे पठाणने म्हटले आहे.

धोनीचे चेन्नईशी अतूट नाते

चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्रसिंह धोनी हे एक वेगळे समीकरण तयार झाले आहे. त्यांच्यातील नाते अतूट असले तरी यापुढे खेळाडू म्हणून नव्हे तर एका वेगळ्या भूमिकेत धोनी चेन्नई संघासोबत पाहायला मिळेल. ४२ वर्षीय धोनीला गेल्या मोसमात चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्याने चेन्नईला पाचवे जेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका साकारली होती. त्यानंतर धोनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

कर्णधार बदलाचा दुसरा प्रयोग

महेंद्रसिंह धोनी वगळता कर्णधार बदल करण्याचा चेन्नईचा हा गेल्या १५ मोसमातील दुसरा प्रयोग असणार आहे. २०२२च्या मोसमात आठ सामन्यांनंतर धोनीऐवजी चेन्नईची धुरा रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली होती. “त्यावेळी आमचा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. यावेळी मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे,” असेही विश्वनाथन म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in