

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेटविश्वातील दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी याची आयपीएलमधील खेळाडू म्हणून कारकीर्द अखेर मंगळवारी संपुष्टात आली. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाने त्याची मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्ती केली आहे. आगामी हंगामासाठी संघातील कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी निश्चित करण्यासाठी झालेल्या चर्चेदरम्यान धोनीने निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्याची माहिती संघाच्या सहमालक रूपा गुरुनाथ यांनी दिली.
वाढत्या वयासोबतच वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे ४५ वर्षीय धोनीचा खेळाडू म्हणून सहभाग गेल्या काही वर्षांत कमी झाला होता. २०२६ च्या आयपीएल हंगामातील एकाही सामन्यात खेळण्याच्या स्थितीत तो नव्हता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीचे संकेत आधीपासूनच मिळत होते.
सीएसकेने जारी केलेल्या निवेदनात धोनीची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. धोनीने २०२० मध्ये इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता सीएसकेकडून त्याच्या नावाची सात क्रमांकाची जर्सी निवृत्त केली जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन म्हणाले, “महेंद्रसिंह धोनीशिवाय चेन्नई संघाची कल्पनाच करता येणार नाही. गेल्या दोन दशकांपासून आम्ही यश, अपयश आणि अनेक चढ-उतारांच्या काळात एकमेकांसोबत वाटचाल केली आहे.”
श्रीनिवासन यांच्या कन्या आणि संघाच्या सहमालक रूपा गुरुनाथ म्हणाल्या, “धोनी सीएसके कुटुंबाचा मार्गदर्शक म्हणून कायमचा भाग असेल. त्याचा अनुभव आणि कौशल्य आमच्यासाठी अमूल्य आहे. विशेषतः सध्या संघात बदलाचे पर्व सुरू असताना त्याचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. संघात अनेक युवा खेळाडू आहेत. त्यांना मार्गदर्शन करून पुढील पिढी घडविण्यात धोनीची भूमिका महत्त्वाची असेल.”
विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या धोनीने सीएसकेला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो ५,३१४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच २७२ सामने खेळून तो सीएसकेकडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.
व्हिडीओ कॉलद्वारे निवृत्तीचा निर्णय कळवला
आगामी महिन्यात होणाऱ्या लिलावाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू कायम ठेवण्याबाबत चर्चा सुरू असताना धोनीने निवृत्तीचा निर्णय कळविल्याची माहिती रूपा गुरुनाथ यांनी संघाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओद्वारे दिली. त्या म्हणाल्या, “काही महिन्यांपूर्वी मी धोनीला भेटले होते. त्यावेळी आगामी हंगामात आपण खेळू शकू की नाही, याबाबत खात्री नसल्याचे त्याने सांगितले होते. शनिवारी आम्ही संघातील कोणत्या खेळाडूंना मुक्त करायचे, याबाबत चर्चा करण्यासाठी व्हिडीओ कॉलवर एकत्र आलो होतो. त्यावेळी धोनी अतिशय शांतपणे म्हणाला, कदाचित या यादीत माझेही नाव समाविष्ट करायला हवे.”
आयपीएलची पाच जेतेपदे
पाच आयपीएल विजेतेपदांव्यतिरिक्त धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने दोन वेळा चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले. या स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदे मिळवणारा कर्णधार म्हणूनही धोनीची नोंद आहे. चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचे अखेरचे आयोजन २०१४ मध्ये करण्यात आले होते.
यापुढेही चेन्नईसोबतच !
धोनी आणि सीएसके यांच्यातील विशेष नाते पाहता, खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही तो संघासोबत जोडलेला राहणार आहे. रूपा गुरुनाथ म्हणाल्या, “महेंद्रसिंह धोनीसारखा खेळाडू आयुष्यात एकदाच पाहायला मिळतो.”
धोनीची आयपीएलमधील कारकीर्द
२००८ मध्ये सीएसकेमध्ये प्रवेश : आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी २००८ मध्ये झालेल्या लिलावात सीएसकेने धोनीला खरेदी केले. पहिल्याच हंगामापासून त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. जवळपास दोन दशके तो या संघाचा प्रमुख चेहरा राहिला.
पाच जेतेपदे : धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी पाच वेळा आयपीएल विजेतेपदे मिळवली. कर्णधार म्हणून सर्वाधिक आयपीएल विजेतेपदे मिळवण्याच्या विक्रमात तो रोहित शर्मासोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे.
सलग दोन विजेतेपदे जिंकणारा पहिला कर्णधार : २०१० आणि २०११ मध्ये सलग दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा धोनी हा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला.
दहा वेळा अंतिम फेरीत प्रवेश : कर्णधार म्हणून धोनीने सीएसकेला दहा वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत आणि १२ हंगामांत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवून दिले.
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या : २०१९ मध्ये धोनीने आयपीएलमधील सर्वोच्च ८४ धावांची नाबाद खेळी केली. या हंगामात त्याची फलंदाजीची सरासरी ८३.२० होती. त्याने आयपीएलमध्ये एकही शतक झळकावले नसले, तरी २४ अर्धशतके नोंदवली आहेत.
२५० सामने खेळणारा पहिला खेळाडू : २०२३ मध्ये आयपीएलमध्ये २५० सामने खेळणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरला.
२०२५ मध्ये पुन्हा कर्णधार : ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर धोनीने २०२५ मध्ये पुन्हा सीएसकेचे कर्णधारपद स्वीकारले.
२०२६ चा संपूर्ण हंगाम मुकला : पोटरी आणि अंगठ्याच्या दुखापतींमुळे धोनीला २०२६ च्या संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर राहावे लागले. त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील हा पहिलाच हंगाम ठरला, ज्यात त्याला एकही सामना खेळता आला नाही.
५,४३९ धावांसह कारकीर्दीचा शेवट : धोनीने २७८ आयपीएल सामन्यांत ३८.३० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या स्ट्राइक रेटने एकूण ५,४३९ धावा केल्या. आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.