
‘‘आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे. आमचे अजून बरेच सामने बाकी आहेत. मी आता काही बोललो तर प्रशिक्षकांवर दबाव येईल आणि मी तसे करणार नाही. कारण मला त्यांच्यावर कोणताही दबाव टाकायचा नाही, ’’ असे स्पष्टपणे सांगत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या निवृत्तीबाबतच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. धोनीने आयपीएलमधील पाच हजार धावांचा टप्पा पार केला आहे. धोनी सध्या उत्कृष्ट लयीत आहे. सीएसकेच्या एका कार्यक्रमादरम्यान निवृत्तीच्या बातम्यांबाबत धोनीने सांगितले की, ‘‘माझ्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु असल्या; तरी आताच त्याचा विचार नको. निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ शिल्लक आहे.
दरम्यान, धोनीच्या बोलण्यावरून तो या सीझनमध्ये किंवा पुढील दोन ते तीन सीझनमध्ये निवृत्त होण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे. ४१ वर्षीय धोनी आयपीएल २०२३ मध्येही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलिकडेच त्याने सीएसकेचा कर्णधार म्हणून दोनशेवा सामना खेळला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात धोनीने १७ चेंडूत ३२ धावा फटकविल्या होत्या. धोनीने आपल्या डावात एक चौकार आणि तीन षटकार लगावले होते. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १८८.२४ चा होता.
धोनी आयपीएलच्या या सीझनमध्ये शेवटचा खेळताना दिसणार असल्याचे आयपीएलचा हा सीझन सुरू होण्यापूर्वी बोलले जात होते. धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. मात्र आता धोनीने त्यावर पडदा टाकला आहे. धोनीने गेल्या मोसमात सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते; तेव्हा रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी निराशाजनक झाल्याने जडेजानेच पुन्हा धोनीकडे कर्णधारपद देण्याची तयारी दर्शविली.
वय आडवे येत नाही - मोईन अली
धोनीच्या निवृत्तीच्या वृत्तावर त्याच्या संघातील अष्टपैलू खेळाडू म्हटले होते की, ‘‘धोनी वयाच्या ४१ व्या वर्षीही खूप चांगली कामगिरी करीत आहे. मला वाटते की धोनी पुढील सीझन देखील आरामात खेळू शकेल. कारण त्याचे वय त्याच्या कामगिरीत कुठेही आडवे येत नाही. ’’