चेन्नई : भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी २०२६मध्येही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळण्याची शक्यता आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व मात्र महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाडच करणार आहे.
२०२५च्या आयपीएलमध्ये ऋतुराजला गुडघ्याच्या दुखापतीमुळे अवघ्या पाच सामन्यांनंतर स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे ४४ वर्षीय धोनीकडे पुन्हा संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र धोनीची जादू यावेळी फिकी पडली. चेन्नईला २०२५च्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत तळाशी म्हणजेच १०व्या स्थानी समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सलग दोन हंगामांमध्ये चेन्नईला बाद फेरी गाठता आली नाही. त्यासंबंधी एका कार्यक्रमात धोनीने मत मांडतानाच ऋतुराज पुढील हंगामात नेतृत्व करेल, असे स्पष्ट केले.
“२०२५चा हंगाम चेन्नईसाठी नक्कीच आव्हानात्मक होता. मात्र यामुळे संघात मोठे बदल करण्याची गरज नाही. संघातील फलंदाजीची चिंता जवळपास मिटली आहे. तसेच ऋतुराज संघात परतल्यावर फलंदाजी आणखी बळकट होईल. तोच संघाचे नेतृत्वही करेल,” असे धोनी म्हणाला.
“डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे मिनी ऑक्शन होईल. यादरम्यान आम्हाला पुन्हा एकदा संघात कोणत्या जागा भरायच्या आहेत, याचा आढावा घेता येईल. तूर्तास मी इतकेच सांगू शकतो की पुढील वर्षी ऋतुराजच चेन्नईचे नेतृत्व करेल,” धोनीने सांगितले.
दरम्यान, २८ वर्षीय ऋतुराज ८ एप्रिलला आयपीएलमध्ये पंजाबविरुद्ध अखेरची लढत खेळला. आता आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघात निवड करण्यात आली आहे. ऋतुराज जुलै महिन्यात कौंटी स्पर्धेतही यॉर्कशायर स्पर्धेत खेळणार होता. मात्र वैयक्तिक कारणास्तव त्याने माघार घेतली.