
मुंबई : २५ वर्षीय फलंदाज शुभमन गिल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार होऊ शकतो. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सध्या गिल कर्णधारपदाच्या शर्यतीत अग्रेसर असल्याचे समजते.
अनुभवी फलंदाज रोहितने काही दिवसांपूर्वीच कसोटी प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आत २० जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारताचा नवा कसोटी कर्णधार शोधण्याचे आव्हान निवड समितीपुढे आहे. जसप्रीत बुमरा भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. मात्र त्याची तंदुरुस्ती व वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने बुमरा त्या मालिकेत पाचही सामने खेळणे कठीण वाटते. अशा स्थितीत भविष्याचा विचार करता एखाद्या फलंदाजाचीच कर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तूर्तास गिलचे पारडे यासाठी जड आहे. गिल हा सध्या एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे. तसेच टी-२०मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध भारताचे नेतृत्व केले आहे. कसोटीत गिल तिसऱ्या क्रमांकावर भारताचा प्रमुख फलंदाज असून यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत किंवा के. एल. राहुल यांच्या तुलनेत त्याला कर्णधारपदासाठी अधिक पसंती लाभत आहे.
पंत भारताच्या कसोटी संघातील यष्टीरक्षक म्हणून पक्का आहे. तसेच यशस्वी व राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमक दाखवून संघातील स्थान पक्के केले आहे. विराट कोहलीकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याचा प्रस्ताव आहे. तर रवींद्र जडेजासुद्धा जवळपास कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे एकूणच गिल शर्यतीत अग्रेसर आहे.