पराभव मुंबई इंडियन्सचा; कठीण काळ हार्दिकचा!माजी क्रिकेटपटूंकडून पुन्हा एकदा टीकेचा भडिमा

महेंद्रसिंह धोनीने ४ षटकांत ३ दमदार षटकारांसह नाबाद २० धावा फटकावून चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळे चेन्नईने मुंबईसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. मग रोहित शर्माच्या ६३ चेंडूंतील नाबाद १०५ धावांच्या शतकी खेळीनंतरही मुंबईला २० षटकांत ६ बाद १८६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
पराभव मुंबई इंडियन्सचा; कठीण काळ हार्दिकचा!माजी क्रिकेटपटूंकडून पुन्हा एकदा टीकेचा भडिमा
Published on

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागला. सहा सामन्यांतील चौथ्या पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी घसरला असून रविवारच्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे. माजी क्रिकेटपटूंनी हार्दिकचे नेतृत्व तसेच गोलंदाजीवर कडाडून टीका केली आहे.

महेंद्रसिंह धोनीने ४ षटकांत ३ दमदार षटकारांसह नाबाद २० धावा फटकावून चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळे चेन्नईने मुंबईसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. मग रोहित शर्माच्या ६३ चेंडूंतील नाबाद १०५ धावांच्या शतकी खेळीनंतरही मुंबईला २० षटकांत ६ बाद १८६ धावांपर्यंतच मजल मारता आली. हार्दिकने मुंबईच्या गोलंदाजीदरम्यान २०वे षटक टाकले होते. याच षटकात धोनीने ३ षटकारांसह २६ धावा वसूल केल्या. त्याशिवाय आठव्या षटकानंतर हार्दिकने शिवम दुबेला घाबरून फिरकीपटूला एकही षटक गोलंदाजी दिली नाही. त्याशिवाय आकाश मढवालचे चौथे षटक शिल्लक असतानाही स्वत: धोनीसमोर गोलंदाजीला येण्याचा निर्णय हार्दिकसह मुंबईला महागात पडला. यामुळे चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंनी हार्दिकवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

हार्दिक काय म्हणाला?

मथीशा पाथिरानाने मिळवलेले चार बळी सामन्याला कलाटणी देणारे ठरले. आम्ही त्यांना १६व्या षटकापर्यंत कडवी झुंज दिली. मात्र नंतर लक्ष्य आपोआप दूर होत गेले. स्टम्प्समागे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी माणूस आहे. दुबे फलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाजांनी मारा करणे अधिक योग्य वाटले. या खेळपट्टीवर फिरकीपटूंवर आक्रमण करणे सोपे आहे. त्यामुळेच वेगवान गोलंदाजांचा वापर केला. यापुढे चार सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर खेळायचे आहेत. आम्ही या आव्हानासाठी सज्ज आहोत. नक्कीच झोकात पुनरागमन करू, असे हार्दिक मुंबईच्या पराभवानंतर म्हणाला.

हार्दिकची गोलंदाजी व नेतृत्व फारच साधारण होते. अखेरच्या षटकात धोनी स्ट्राइकवर असताना हार्दिकने जणू त्याला हवे त्या ठिकाणी चेंडू टाकले. गेल्या काही सामन्यांत मी पाहिलेले ही अतिशय सुमार गोलंदाजी होती. मुंबईने चेन्नईला १९० धावांपर्यंत रोखणे अपेक्षित होते. मात्र त्या १०-१५ अतिरिक्त धावा जय-पराजयमधील अंतर ठरणार, हे पहिल्या इनिंगनंतरच जवळपास स्पष्ट झाले.

- सुनील गावसकर

फिरकीपटू गोपाळने रवींद्रला बाद केल्यानंतर त्याला एकही षटक गोलंदाजी मिळाली नाही. बुमराव्यतिरिक्त सर्व वेगवान गोलंदाजांची धुलाई होत असताना हार्दिकने अखेरच्या १० षटकांत एकदाही फिरकीपटूकडे चेंडू सोपवला नाही. हे खरंच अनाकलनीय होते. चाहत्यांकडून डिवचले जाण्यासह स्वत:ची कामगिरी खालावत असल्याने हार्दिकच्या देहबोलीवरही परिणाम होत आहे. त्याला मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.

- केव्हिन पीटरसन

हार्दिक हा काही नवा खेळाडू नाही. आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा त्याला पुरेसा अनुभव आहे. आकाश मढवालला २०वे षटक न देऊन संघ व्यवस्थापन अथवा कर्णधाराला त्याच्यावर विश्वास नाही, हे दिसून येते. तसेच हार्दिकने तो ‘डेथ ओव्हर्स’मध्ये गोलंदाजी करण्याइतपत प्रगल्भ नाही, हे दाखवून दिले. शिवम दुबे टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात नसल्यास मला खरंच आश्चर्य वाटेल.

- इरफान पठाण

logo
marathi.freepressjournal.in