मुंबई विजयाची हॅटट्रिक साधणार? बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जशी आज लढत; महेंद्रसिंह धोनीचा वानखेडेवरील शेवटचा सामना

पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईला यंदा चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र आता मुंबईचे फलंदाज चांगले फॉर्मात आले आहेत. सूर्यकुमार यादवने बंगळुरूविरुद्ध १७ चेंडूंत अर्धशतक साजरे केले. त्यामुळ‌े घरच्या मैदानावर पुन्हा एकदा चमक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. इशान किशन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीकडून मुंबईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
मुंबई विजयाची हॅटट्रिक साधणार? बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जशी आज लढत; महेंद्रसिंह धोनीचा वानखेडेवरील शेवटचा सामना

मुंबई : भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी कारकीर्दीतील अखेरच्या टप्प्यात आला आहे. यंदाची आयपीएल त्याची शेवटची असल्यामुळे वानखेडे स्टेडियमवर रविवारी होणारा सामना हा त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरणार आहे. त्यामुळे मुंबईकर चाहत्यांसमोर सर्वांगसुंदर खेळ करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदे पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी महामुकाबला रंगणार आहे.

याच वानखेडे स्टेडियमवर २०११ साली धोनीने विश्वचषक जिंकून दिला होता. आता त्याच मैदानावर धोनी पहिल्यांदाच चेन्नईचा खेळाडू म्हणून सामना खेळणार आहे. वयाच्या ४२व्या वर्षीही धोनीची यष्ट्यांमागील जादू कायम आहे. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणूनच नव्हे तर एक रणनीतीकार म्हणूनही धोनीचा वापर चेन्नईला होत आहे. पण बाहेरच्या मैदानावर खेळताना चेन्नईला यंदा दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे वानखेडेवर तरी ही नामुष्की ओढवणार नाही, याची काळजी चेन्नईला घ्यावी लागणार आहे. चेन्नईने मुंबईविरुद्धच्या गेल्या पाच लढतीत चार सामने जिंकले आहेत. त्यातच गेल्या मोसमातील शेवटचा सामना सात विकेट्सनी जिंकला आहे, त्यामुळे चेन्नईचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे.

दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच जेतेपदे पटकावल्यामुळे हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखले जातात. दोन्ही संघांच्या कर्णधारपदाची धुरा यंदा बदलण्यात आली आहे. मुंबईने हार्दिक पंड्याकडे तर चेन्नईने ऋतुराज गायकवाड याच्याकडे नेतृत्व सोपवले आहे. मात्र दोन्ही संघातील टश्शन अजूनही कायम आहे. त्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांसमोर मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २३० पेक्षा जास्त धावा फटकावल्या तर रॉयल चॅलेंजर्सचे जवळपास २०० धावांचे आव्हान मुंबईने चार षटके शिल्लक राखून पार केले.

पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईला यंदा चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र आता मुंबईचे फलंदाज चांगले फॉर्मात आले आहेत. सूर्यकुमार यादवने बंगळुरूविरुद्ध १७ चेंडूंत अर्धशतक साजरे केले. त्यामुळ‌े घरच्या मैदानावर पुन्हा एकदा चमक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. इशान किशन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीकडून मुंबईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

मुंबईप्रमाणेच चेन्नईचे फलंदाजही चांगल्या फॉर्मात आहेत. कर्णधार ऋतुराज गायकवाड फलंदाजीत चमकत नसला तरी चेन्नईच्या विजयात उपयुक्त योगदान देत आहे. त्याचप्रमाणे रचिन रवींद्र, डॅरेल मिचेल तसेच शिवम दुबे (१७६ धावा), रवींद्र जडेजा आणि धोनी हाणामारीच्या षटकात अप्रतिम फटकेबाजी करत आहेत. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनाही जसप्रीत बुमराचा भेदक स्पेल टाळावा लागणार आहे. बुमराने गेल्या सामन्यात पाच विकेट्स मिळवत प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरवली होती. त्याचबरोबर चेन्नईचे तुषार देशपांडे आणि शार्दूल ठाकूर हे घरच्या मैदानावर खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही मुंबईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मुंबईची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे लक्ष्य २२०-२३० धावा फटकावण्याकडे असेल.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमरा, पियूष चावला, गेराल्ड कोट्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अनुज कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना माफका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वधेरा, लुक वूड.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, अरावेली अविनाश, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शैक रशीद, मोईन अली, शिवम दुबे, राज्यवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरेल मिचेल, रचिन रवींद्र, मिचेल सान्तनेर, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिझूर रहमान, मथीशा पाथिराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दूल ठाकूर, महेश तीक्ष्णा, समीर रिझवी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in