न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेला नमवून प्रथमच टी-२० विश्वचषकाला गवसणी

न्यूझीलंडच्या महिला संघाने अखेर रविवारी रात्री जगज्जेत्या ठरण्याचा मान मिळवला. महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीत दोन वेळच्या उपविजेत्या न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमवले.
न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेला नमवून प्रथमच टी-२० विश्वचषकाला गवसणी
आयसीसी/एक्स
Published on

दुबई : न्यूझीलंडच्या महिला संघाने अखेर रविवारी रात्री जगज्जेत्या ठरण्याचा मान मिळवला. महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीत दोन वेळच्या उपविजेत्या न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ३२ धावांनी नमवले. याबरोबरच न्यूझीलंडने प्रथमच विश्वचषक उंचावण्याची किमया साधली. प्रतिभावान अष्टपैलू अमेलिया कर (४३ धावा आणि ३ बळी) किवी संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या. सुझी बेट्स (३२) आणि अमेलिया (४३) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची भर घातली. बेट्स माघारी परतल्यावर अमेलियाने ब्रूक हॅलीडेसह (३८) चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली. मॅडी ग्रीनने (१२) उपयुक्त फटकेबाजी केली. कर्णधार सोफी डिवाईन (६) मात्र अपयशी ठरली. आफ्रिकेसाठी नोनकुलुलेको मलाबाने २ बळी मिळवले.

१५९ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला मात्र २० षठकांत ९ बाद १२६ धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार लॉरा वोल्वर्ड (३३) व ताझ्मिन ब्रिट्स (१७) यांनी ४१ चेंडूंत ५१ धावांची सलामी नोंदवली. मात्र ऑफस्पिनर अमेलियाने वोल्वर्डला बाद केले व आफ्रिकेचा डाव घसरला. त्यांचे पुढील ३ फलंदाज एकेरी धावसंख्येतच बाद झाले. मॅरीझेन काप (८), अेनेक बोश (९), सून लूस (८) यांनी निराशा केली. अमेलिया व मध्यमगती गोलंदाज रोसमेरी मेरने प्रत्येकी ३ बळी मिळवले. स्पर्धेत १३५ धावा करण्यासह १५ बळीही मिळवल्याने अमेलियालाच सामनावीरसह विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले. २४ वर्षीय अमेलिया भारताच्या वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळते.

यंदा हा महिलांच्या टी-२० विश्वचषकाचा नववा हंगाम होता. आतापर्यंत ६ वेळा ऑस्ट्रेलियाने, तर इंग्लंड, वेस्ट इंडिज व न्यूझीलंडने प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. न्यूझीलंडला २००९ व २०१०मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. भारतीय महिलांनी फक्त एकदाच (२०२०) टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. यंदा ते साखळीतच गारद झाले.

आयसीसीच्या संघात हरमनप्रीत एकमेव भारतीय

आयसीसीने निवडलेल्या २०२४च्या टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंच्या संघात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला स्थान लाभले आहे. ती या संघात स्थान मिळवणारी एकमेव खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीतने स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक २ अर्धशतके झळकावली. तसेच स्पर्धेत ४ सामन्यांत १५० धावा करताना तिने सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथे स्थान मिळवले. या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वर्डकडे देण्यात आले असून न्यूझीलंड व आफ्रिकेच्या प्रत्येकी ३ खेळाडूंना या संघात स्थान मिळाले.

logo
marathi.freepressjournal.in