
बंगळुरू : सध्या तरी मी क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करत नाही. मी खेळाचा आनंद घेत आहे आणि स्पर्धात्मक वृत्ती माझ्यात कायम आहे, असे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली म्हणाला. या वक्तव्याने विराटच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दुबईत नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत कोहलीने शानदार कामगिरी केली. दरम्यान या स्पर्धेनंतर रोहितनेही आपण खेळतच राहणार असल्याचे जाहीर केले.
नाराज होऊ नका. मी कोणतीही घोषणा करणार नाही. सध्या सर्वकाही ठिकठाक आहे. क्रिकेट खेळण्यावर मी प्रेम करत आहे, असे विराट आरसीबीच्या इनोव्हेशन लॅबमध्ये झालेल्या एका चर्चा सत्रादरम्यान म्हणाला.
क्रिकेट खेळून मला आनंद मिळत आहे. स्पर्धात्मक वृत्ती माझ्यात आहे. जो पर्यंत या गोष्टी माझ्यात आहेत, तोवर मी खेळत राहणार. आता माझ्यासमोर कोणते उद्दिष्ट्य राहिलेले नाही, असे विराट म्हणाला.
आपल्यात असलेल्या स्पर्धात्मक वृत्तीमुळे खेळाडूला त्या खेळापासून दूर जाण्यासाठी योग्य वेळ मिळत नाही. त्यामुळे स्पर्धात्मक वृत्ती असलेल्यांना निवृत्तीच्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. या प्रश्नावर मी राहुल द्रविड यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. ते म्हणाले की तुम्हाला नेहमीच स्वत:च्या संपर्कात राहावे लागते, असे कोहली म्हणाला.
तुमच्या आयुष्यात तुमचे स्थान कुठे आहे ते शोधा. तुम्ही कदाचित एका कमकुवत टप्प्यातून जात असाल आणि तुम्हाला असे वाटेल की हे असेच आहे. पण ते कदाचित नसेलही. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा माझी स्पर्धात्मक वृत्ती मला ते स्वीकारू देणार नाही. कदाचित आणखी एक महिना. कदाचित आणखी सहा महिने. त्यामुळे मला वाटते की हा एक चांगला समतोल आहे. माझ्या आयुष्यातील या टप्प्यावर मी खूप आनंदी आहे," तो स्पष्ट करतो.
वाढत्या वयामुळे खेळात त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात मर्यादा येत आहेत, हे विराट कोहलीला माहित आहे. दरम्यान मला फिट राहायचे आहे, असे तो म्हणाला.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघातील वरिष्ठ खेळाडूंकडे बोट दाखवले जात होते. विराटच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित केले जात होते. विराटने निवृत्ती घ्यावी, अशी ओरड होत होती. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या विराटने शतक झळकावले. त्यामुळे त्यानेही टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. दरम्यान, शनिवारी स्वत: विराटने खुलासा केला. क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या चर्चांना त्याने पूर्णविराम दिला आहे.