
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव पुन्हा एकदा भीषण स्वरूपात समोर आला आहे. ४७ तासांपूर्वी झालेल्या युद्धविरामानंतर पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला करण्यात आला. पक्तिका प्रांतातील उरगुन आणि बरमल जिल्ह्यांमधील निवासी भागांवर झालेल्या या हल्ल्यांमध्ये ३ तरुण अफगाण क्रिकेटपटूंसह ५ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये कबीर आगा, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन खेळाडूंचा समावेश असून ते सर्व अफगाणिस्तानमधील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती देत पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत.
सामन्यातून परतत असताना हल्ला
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवेदनानुसार, हे तिघे खेळाडू पक्तिका प्रांताची राजधानी शराना येथे एका फ्रेंडली क्रिकेट सामन्यासाठी गेले होते. सामना संपल्यानंतर ते उरगुनकडे आपल्या घरी परतत असताना पाकिस्तानी लष्कराच्या हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. बोर्डाने सांगितले की, या हल्ल्यात ५ अन्य नागरिकही ठार झाले, तर ७ जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानकडून युद्धविरामाचे उल्लंघन
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्षाला गेल्या काही दिवसांत वेग आला आहे. इस्लामाबादने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (TTP) ठिकाणांवर हल्ला केल्यापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या चकमकीनंतर बुधवारी (दि. १५) सायंकाळी दोन्ही बाजूंनी युद्धविरामास मान्यता दिली होती. परंतु, शुक्रवारी रात्री पाकिस्तानकडून केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे हा शस्त्रविराम तुटला.
स्थानिक माध्यमांनुसार, हे हल्ले ड्युरंड रेषेजवळील उरगुन आणि बरमल जिल्ह्यांवर झाले, जेथे मोठ्या संख्येने नागरिक राहत होते. या भागांतील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तानात संतापाची लाट उसळली आहे.