
दुबई : पुढील वर्षी रंगणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपुढे (आयसीसी) पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) झुकावे लागले आहे. तडजोडीच्या आश्वासनानंतर पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संमिश्र प्रारूपातील आयोजनाचा निर्णय मान्य केला आहे. त्यामुळे आता २०२५मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताला पाकिस्तानात जावे लागणार नाही. भारताचे सामने प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे खेळवण्यात येतील, असे समजते. तसेच भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धांच्या सामन्यांसाठी पाकिस्तान येणार नाही, असेही आयसीसीने स्पष्ट केले.
पुढील वर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी २०१७मध्ये इंग्लंडला अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झालेली. त्यामध्ये पाकिस्तानने भारताला नमवून जेतेपद मिळवले. मात्र पाकिस्तानातील सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र शासनाने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात न जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाकरिता दुबईचा पर्यायही सुचवला आहे. त्यासंबंधीचे पत्र बीसीसीआयने आयसीसीला दिले होते. त्यानंतर आयसीसीने हायब्रिड मॉडेल म्हणजेच संमिश्र प्रारूपाचा निर्णय पाकिस्तानला मान्य करण्यास भाग पाडले. गेल्या ६ महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाचा तिढा कायम होता.
आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असली तरी भारताचे सामने अमिरातीत होतील. तसेच अमिरातीचा पर्याय वगळता श्रीलंकेतही भारताचे सामने आयोजित केले जाऊ शकतात. भारत व पाकिस्तान उपांत्य व अंतिम फेरीत आमनेसामने आले, तर ही लढतसुद्धा अन्य ठिकाणीच खेळवण्यात येईल. मात्र याप्रमाणेच भारतात होणाऱ्या २०२६चा टी-२० विश्वचषक व २०२५च्या महिलांच्या विश्वचषकात पाकिस्तानचे सामने अन्य देशात खेळवण्यात येतील, असेही आयसीसीने स्पष्ट केले. चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचे सामने नेमका कुठे होतील, याविषयी आयसीसी लवकरच निर्णय घेईल.
२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धा तसेच आशिया चषकात आमनेसामने येतात. तसेच २०१२नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात एखादी मालिकासुद्धा झालेली नाही. २०२३च्या आशिया चषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीचेसुद्धा संमिश्र प्रारूपात आयोजन करण्यात यावे, असे बीसीसीआयने सुचवले होते. २०२३च्या आशिया चषकात भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. तर पाकिस्तानचा संघ काही लढती त्यांच्या देशात खेळला. त्यानंतर २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. मात्र त्यांना मुंबईत खेळण्याची संधी मिळाली नाही.
दरम्यान, २०१७ मध्ये पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, त्यानंतर आता ८ वर्षांनी या एकदिवसीय स्वरूपातील स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे आठ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले आहेत.
आयसीसीच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
२०२५ ते २०२७ या कालावधीतील भारत, पाकिस्तानात होणाऱ्या सर्व आयसीसी स्पर्धा संमिश्र प्रारूपात खेळवण्यात येतील.
म्हणजेच पुढील वर्षी होणारा महिलांचा विश्वचषक व २०२६मध्ये होणारा पुरुषांचा टी-२० विश्वचषक भारतात होणार असला, तरी पाकिस्तानचे सामने अन्य देशात खेळवण्यात येतील.
त्याचप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीसह २०२८च्या महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. मात्र या स्पर्धेतही संमिश्र प्रारूपाचा अवलंब केला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक व अन्य ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल. स्पर्धेत ८ संघांची २ गटांत विभागणी करण्यात येईल.