पाकिस्तान आयोजनावर ठाम! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाबाबत आज होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आपल्या देशातच पूर्णपणे आयोजन करण्याच्या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ठाम आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत कोणता निर्णय घेण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पाकिस्तान आयोजनावर ठाम! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाबाबत आज होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
Published on

दुबई : पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आपल्या देशातच पूर्णपणे आयोजन करण्याच्या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ठाम आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत कोणता निर्णय घेण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

१९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी २०१७मध्ये इंग्लंडला अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झालेली. त्यामध्ये पाकिस्तानने भारताला नमवून जेतेपद मिळवले. मात्र पाकिस्तानातील सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र शासनाने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात न जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाकरिता दुबईचा पर्यायही सुचवला आहे. त्यासंबंधीचे पत्र बीसीसीआयने आयसीसीला दिले होते. आयसीसीने यासंबंधी पीसीबीला कळवले आहे. मात्र पीसीबीने आयसीसीकडे भारताच्या नकारामागील स्पष्टीकरण मागितले आहे.

२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धा तसेच आशिया चषकात आमनेसामने येतात. तसेच २०१२नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात एखादी मालिकासुद्धा झालेली नाही. त्यामुळेच मार्च २०२५मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाणार की नाही, याविषयीचा निर्णय केंद्र शासन घेईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे २०२३च्या आशिया चषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीचेसुद्धा संमिश्र प्रारुपात (हायब्रीड मॉडेल) आयोजन करण्यात यावे, असे बीसीसीआयने सुचवले आहे. २०२३च्या आशिया चषकात भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. तर पाकिस्तानचा संघ काही लढती त्यांच्या देशात खेळला.

दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा संमिश्र प्रारुपात स्पर्धा खेळवण्यास नकार दर्शवला. “स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानातच आयोजित करू. भारताला या स्पर्धेत खेळायचे नसल्यास त्यांनी तसे आयसीसीला कळवावे. मात्र पाकिस्तान हा मान गमावणार नाही,” असे मत नक्वी यांनी व्यक्त केले. त्यामुळे पाकिस्तान मागे हटण्यास तयार नाही. दुसरीकडे १ डिसेंबरपासून बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शहा ‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यापूर्वीच ‘आयसीसी’ला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे आता शुक्रवारी आयसीसी पाकिस्तानकडून स्पर्धेच्या यजमानपदाचा मान काढून घेणार की स्पर्धा संमिश्र प्रारुपात खेळवून भारताच्या लढती अन्य ठिकाणी आयोजित करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

...तर पाकिस्तानचे ५४.९० कोटींचे नुकसान

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात न झाल्यास अथवा पुढे ढकलण्यात आली, तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाला ५४.९० कोटींचे नुकसान होऊ शकते. पाकिस्तानने कराची, लाहोर, रावळपिंडी येथील मैदानांच्या नूतनीकरणासाठी आधीच मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च केला आहे. त्यामुळे स्पर्धा अन्यत्र खेळविल्यास पाकिस्तान कायदेशीर लढाईचा विचार करत आहे.

आयसीसीपुढे हे तीन पर्याय

स्पर्धेचे आयोजन संमिश्र प्रारुपात (हायब्रीड मॉडेल) करावे. जेणेकरून भारताचे सामने दुबईत होतील, तर अन्य संघ मात्र पाकिस्तानमध्ये खेळतील. (उदा. आशिया चषक २०२३)

स्पर्धा पूर्णपणे दुसऱ्या देशात आयोजित करावी. मात्र यजमानपदाचे हक्क पाकिस्तानकडेच असतील. (उदा. २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपदाचे हक्क भारताकडे होते. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) खेळवण्यात आली.)भारताला वगळून पूर्ण स्पर्धा पाकिस्तानातच आयोजित करावी, हा अखेरचा पर्याय आयसीसीपुढे असेल.

logo
marathi.freepressjournal.in