आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत तिढा कायम

यजमानपदाचा हक्क कदापि सोडणार नाही; पाकिस्तान भूमिकेवर ठाम
आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत तिढा कायम

कितीही नुकसान सोसावे लागले; तरी यजमानपदाचा हक्क कदापि सोडणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतल्यामुळे आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा तिढा अधिकच वाढत चालल्याचे दिसत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान, पाकिस्तानने माघार घेतल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) २४ कोटी रूपयांचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी सांगितले की, ‘‘जर पाकिस्तान या वर्षीच्या आशिया चषक स्पर्धेत खेळला नाही तर त्याला तीन दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे २४ कोटी रुपये) नुकसान होऊ शकते. पीसीबी आशिया चषक स्पर्धेतून माघार घेण्याचा धोका पत्करू इच्छित नाही. परंतु ही बाब तत्त्वांची असून गरज पडल्यास हे नुकसान भरून काढण्यास पीसीबी तयार आहे.

येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पीसीबी आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी जाणार नाही. त्यामुळे भारतीय संघाने तटस्थ ठिकाणी आपले सामने खेळावे आणि उर्वरित सामन्यांचे आयोजन पाकिस्तानमध्ये व्हावे, असा प्रस्ताव पीसीबीने ठेवला आहे. सेठी म्हणाले की, ‘‘जर आमचा प्रस्ताव मान्य झाला नाही तर आम्ही इतर कोणताही पर्याय स्वीकारणार नाही आणि स्पर्धेत सहभागी होणार नाही. आम्ही आमचे होस्टिंग अधिकार सोडणार नाही.’’

आसीसीची ८० टक्के कमाई भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून येते, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, "आशियाई क्रिकेट परिषदेने पीसीबीचा प्रस्ताव स्वीकारला तर आयसीसीवरही वर्ल्ड कपसाठी असाच प्रस्ताव ठेवण्याचा दबाव असेल." पाकिस्तानने भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला नाही तर आयसीसीसोबतचे संबंध बिघडतील, याबाबत त्यांनी सहमती दर्शवली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in