भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; ICC ने घेतली गंभीर दखल, पाक सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत PCB ला दिली वॉर्निंग

ICC Men’s T20 World Cup 2026: "पीसीबीने अद्याप अधिकृतपणे कळवले नसले तरी पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला दिलेल्या निर्देशांची दखल आम्ही घेतली आहे, 'सिलेक्टिव्ह पार्टिसिपेशन' (निवडक सहभाग) क्रिकेटच्या...
पाकिस्तान क्रिकेट संघ
पाकिस्तान क्रिकेट संघसौजन्य : पीटीआय
Published on

७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी व्हायचे, पण १५ फेब्रुवारी रोजी भारताविरोधात होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार घालायचा, असा निर्णय पाकिस्तान सरकारने रविवारी (दि.१) संध्याकाळी जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याची गंभीर दखल घेतली आहे. "पीसीबीने अद्याप अधिकृतपणे कळवले नसले तरी पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला दिलेल्या निर्देशांची दखल आम्ही घेतली आहे, 'सिलेक्टिव्ह पार्टिसिपेशन' (निवडक सहभाग) क्रिकेटच्या मूलभूत तत्त्वांविरुद्ध असल्याचे स्पष्ट करताना PCB ने दीर्घकालीन परिणामांचा विचार करावा', असा स्पष्ट इशारा आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिला आहे. तसेच, पीसीबीने परस्परसंमतीने तोडगा काढावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

‘निवडक सहभाग’ स्पर्धेच्या पवित्रतेला धक्का - ICC

रविवारी रात्री उशीरा आयसीसीने याबाबत एक प्रेस रिलिज जारी केली. "पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) अद्याप अधिकृतपणे संवाद साधण्यात आला नसला तरी 'निवडक सहभाग' ही भूमिका जागतिक क्रीडा स्पर्धेच्या मूलभूत तत्त्वांशी जुळत नाही. जागतिक स्पर्धेत पात्र ठरलेल्या सर्व संघांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि समान अटींवर स्पर्धेत भाग घेणे अपेक्षित असते", असे ICCने ठामपणे नमूद केले आहे. ICC ने पुढे म्हटले की, "क्रिकेट स्पर्धा या स्पर्धात्मकता, सातत्य, निष्पक्षता आणि क्रीडात्मक प्रामाणिकतेवर आधारित असतात. अशा वेळी एखाद्या संघाच्या निवडक सहभागामुळे स्पर्धेच्या भावनेला आणि पवित्रतेला धक्का बसतो."

PCB ला दिला स्पष्ट इशारा

ICCने सरकारांच्या राष्ट्रीय धोरणांतील भूमिकेचा सन्मान करत असल्याचे नमूद केले असले, तरी हा निर्णय जागतिक क्रिकेटच्या हिताचा नाही, तसेच पाकिस्तानमधील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या हितालाही बाधक असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. “सरकारांच्या राष्ट्रीय धोरणातील भूमिकेचा आम्ही सन्मान करतो, मात्र हा निर्णय जागतिक क्रिकेटसाठी तसेच पाकिस्तानसह जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या हिताचा नाही,” असे आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ICCने PCBला स्पष्ट इशारा देताना म्हटले आहे की, "अशा निर्णयाचे पाकिस्तानमधील क्रिकेटवर दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम होऊ शकतात. या भूमिकेमुळे केवळ पाकिस्तान क्रिकेटवरच नव्हे, तर संपूर्ण जागतिक क्रिकेट परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतो, ज्याचा PCB स्वतः एक सदस्य आणि लाभार्थी आहे", असेही आयसीसीने स्पष्ट केले.

परस्परसंमतीने तोडगा काढावा

"आयसीसीचे प्राधान्य आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाचे यशस्वी आयोजन करणे हेच आहे, आणि ही जबाबदारी पीसीबीसह सर्व सदस्य देशांचीही असायला हवी. PCBने सर्व भागधारकांचे हित जपणारा, परस्परसंमतीने तोडगा काढावा", अशी अपेक्षा ICCने व्यक्त केली आहे.

पाकिस्तानच्या भूमिकेमुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता असून, ICC आणि PCB यांच्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भारतातील सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी फेटाळून लावल्यामुळे बांगलादेशने या स्पर्धेत न खेळण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बांगलादेशची हकालपट्टी करत स्कॉटलंडला स्थान दिले आहे. या घडामोडी लक्षात घेता, पाकिस्ताननेही भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची भूमिका जाहीर केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in