आयपीएल खेळण्यासाठी रणजीचा अनुभव अनिवार्य! क्रिकेटपटूंना शिस्त लावण्यासाठी बीसीसीआय लवकरच लागू करणार नवा नियम

२५ वर्षीय किशनने डिसेंबरमध्ये आफ्रिका दौऱ्यातून सततच्या क्रिकेटपासून ब्रेक तसेच मानसिक स्वास्थ्य जपण्याच्या हेतूने माघार घेतली.
आयपीएल खेळण्यासाठी रणजीचा अनुभव अनिवार्य! क्रिकेटपटूंना शिस्त लावण्यासाठी बीसीसीआय लवकरच लागू करणार नवा नियम

मुंबई : झारखंडचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन प्रथम श्रेणी क्रिकेटकडे दुर्लक्ष करून थेट इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळण्याच्या विचारात आहे. मात्र किशनसारख्याच टी-२० क्रिकेटकडे अधिक कल बाळगणाऱ्या खेळाडूंना वेळीच आवर घालण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच नवा नियम अंमलात आणणार आहे. त्यानुसार बीसीसीआयशी करारबद्ध नसलेल्या खेळाडूंना थेट आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई करण्यात येणार असून यापूर्वी त्यांना किमान ३ ते ४ रणजी सामने खेळणे अनिवार्य असेल, असे समजते.

२५ वर्षीय किशनने डिसेंबरमध्ये आफ्रिका दौऱ्यातून सततच्या क्रिकेटपासून ब्रेक तसेच मानसिक स्वास्थ्य जपण्याच्या हेतूने माघार घेतली. त्यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेलाही मुकला. प्रत्यक्षात किशनच्या माघारी मागील कारण त्याला संघात संधी न मिळणे, हे असल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान, बीसीसीआयने किशनला रणजी स्पर्धा खेळण्याचे आदेश दिले होते. आता १६ फेब्रुवारीपासून झारखंडचा राजस्थानविरुद्ध अखेरचा साखळी सामना सुरू होईल. यामध्ये किशन सहभागी न झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते. किशन सध्या बडोदा येथे हार्दिक पंड्यासह सराव करत आहे. आयपीएलमध्ये किशन व हार्दिक मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतील. त्यामुळेच बीसीसीआयचे पदाधिकारी यावर नाराज आहेत.

“काही खेळाडू लाल चेंडूंच्या सामन्यांना कमी महत्त्व देत आहेत. भारतीय संघातून बाहेर असल्यास ते मुश्ताक अली या टी-२० स्पर्धेत खेळतात. त्यानंतर रणजी स्पर्धेला डावलतात. तंदुरुस्त असून त्यांच्या रणजी संघाने संवाद साधल्यास हे खेळाडू खेळण्यास सरळ नकार देत असल्याची तक्रारही आमच्याकडे आली आहे,” असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

“अशा खेळाडूंवर वेळीच बंधने घालण्यासाठी बीसीसीआय लवकरच नवा नियम अंमलात आणण्याचा विचार करत आहे. या नियमांतर्गत जे खेळाडू भारतीय संघाचा भाग नाहीत अथवा बीसीसीआयच्या कराराचा भाग नाहीत, त्यांना थेट आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. संघातून बाहेर गेलेल्यांना आयपीएलमध्ये सहभागी होण्यापूर्वी रणजी स्पर्धेत खेळणे अनिवार्य असेल. अन्यथा त्यांना लिलावातही नाव नोंदवता येणार नाही,” असेही त्या पदाधिकाऱ्याने नमूद केले.

२२ मार्च ते २६ मे दरम्यान आयपीएल रंगण्याची शक्यता आहे. त्यानंतर जूनमध्ये अमेरिका व वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक होईल.

किशनची वार्षिक करारातून गच्छंती?

इशान किशनची बीसीसीआयच्या वार्षिक करारातून गच्छंती करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने याविषयी काहीही माहिती दिलेली नाही. किशन सध्या बीसीसीआच्या क-श्रेणीत असून त्याला वार्षिक १ कोटी मानधन दिले जाते. किशनने आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली नसती तर सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लंड मालिकेत त्यालाच यष्टिरक्षक म्हणून के. एस. भरत ऐवजी प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी किशनला सर्वप्रथम पुन्हा क्रिकेटकडे वळण्याचे सुचवले होते. किशन अद्याप क्रिकेटपासून दूर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in