एकदिवसीय विश्वचषक ४० षटकांचा करावा; भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मत

सध्याचे क्रिकेट पाहता एकदिवसीय प्रकारच ४० षटकांचे करणे गरजेचे झाले आहे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले
एकदिवसीय विश्वचषक ४० षटकांचा करावा; भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मत

एकदिवसीय क्रिकेटमधील रंगत टिकवून ठेवण्यासाठी या प्रकाराचा विश्वचषक ५० ऐवजी ४० षटकांचा करण्यात यावा, असे भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुचवले आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटमधील रंजकता नाहीशी झाली असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. “एकदिवसीय क्रिकेट जिवंत ठेवायचे असल्यास विश्वचषकातील सामन्यांचे स्वरूप ५०वरून ४० षटकांचा करण्यात यावा. भारताने १९८३मध्ये विश्वचषक जिंकला, तेव्हा तो ६० षटकांचा होता. मात्र कालांतराने तो ५० षटकांचा खेळवण्यात आला. सध्याचे क्रिकेट पाहता एकदिवसीय प्रकारच ४० षटकांचे करणे गरजेचे झाले आहे,” असे शास्त्री म्हणाले.

टी-२० मालिकांचा भडिमार टाळावा

प्रत्येक दौऱ्यात टी-२० मालिकेचा समावेश असणे गरजेचे नाही. जगभरात असंख्य फ्रँचायझी टी-२० स्पर्धा खेळवण्यात येतात. त्यामुळे द्विपक्षीय टी-२० मालिकांच्या अतिरिक्त आयोजनावर लक्ष देऊ नये. कसोटी सामन्यांनाही तितकेच महत्त्व द्यावे, असेही शास्त्री यांनी सुचवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in