
भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडल्याने टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. खरेच दुखापत झाली की कटकारस्थान रचण्यात आले, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जडेजाच्या दुखापतीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामिगरी केली होती. त्यानंतर हाँगकाँगच्या सामन्यामध्येही जडेजाने १५ धावा देत एक विकेट घेतली होती; मात्र अचानक जडेजा दुखापतग्रस्त झाला आणि यामुळे पूर्ण स्पर्धेला मुकला. जडेजाच्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जडेजाला मैदानावर नव्हे, तर मैदानाबाहेर दुखापत झाली होती. अॅडवेंचर अॅक्टिविटीमध्ये स्की-बोर्डवर जडेजाला बॅलन्स साधण्यात अपयश आले आणि त्याला दुखापत झाली. जडेजा अॅडवेंचर अॅक्टिविटी करताना घसरून खाली पडला. याच वेळी त्याचा गुडघा मुडपला. आता ही दुखापत गंभीर झाली असून जडेजाने यावर शस्त्रक्रिया देखील केली आहे. बीसीसीआय लवकरच याची चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे. जडेचाच्या दुखापतीनंतर क्रिकेट वर्तुळात जडेजाबाबत कट रचला गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत; मात्र जडेजाचा फॉर्म पाहता संघातील प्रमुख खेळाडू होता. चौकशी झाल्यास काय उघडकीस येते, ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे.