
नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआय खेळाडूंचे नियम कठोर करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानुसार दौऱ्यावर पत्नीला सोबत नेण्यावरील निर्बंधासह खेळाडू, प्रशिक्षकांचा व्यवस्थापकीय कर्मचारी वर्ग यांना संघाच्या बसमधूनच प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.
४५ किंवा त्याहून अधिक दिवसांचा दौरा असेल तर खेळाडूंना पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत दोन आठवड्यांपर्यंत राहता येईल. जर का त्यापेक्षा कमी कालावधीचा दौरा असेल तर कुटुंबासोबत एक आठवडा राहता येण्याची शक्यता आहे.
सामन्यादरम्यान खेळाडूंना संघाच्या बसमधूनच प्रवास करावा लागणार आहे. ते अन्य वाहनाने प्रवास करू शकत नाहीत. बऱ्याचदा खेळाडू या नियमाचे पालन करतात, परंतु काही वेळा खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचारी अन्य वाहतुकीचा पर्याय स्वीकारतात. नवा नियम लागू झाल्यास खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी या सर्वांनाच संघाच्या बसमधून प्रवास करावा लागणार आहे.
आढावा बैठकीत यावर चर्चा करण्यात आली होती. मात्र निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तातडीने या नियमांचा अवलंब होणे कठीण वाटत आहे.
भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा केला. या बॉर्डर- गावस्कर मालिकेत भारताला १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या दौऱ्यात वरिष्ठ प्रशिक्षक स्टाफ सदस्याच्या खासगी व्यवस्थापकाला संघाच्या बसमध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी हा मुद्दा समोर आला होता.
संघाच्या बसमधून वैयक्तिक व्यवस्थापक प्रवास करतात. तसेच दौऱ्यावर खेळाडूंसोबत पत्नीही असतात. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तसेच लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले.
तसेच खेळाडू आणि प्रशिक्षकांनी केवळ संघाच्या बसनेच प्रवास करावा. परंतु काही वेळा खेळाडू वाहतुकीच्या इतर पर्यायांचा वापर करतात. ते टाळायला हवे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान यावर भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. खेळाडू हे संघाच्या बसमधून नेहमीच प्रवास करत आले आहेत. जर का आता तसे होत नसेल तर ते कोणी बदलले हे शोधणे योग्य आहे? असे चोप्रा सोशल मीडियावर म्हणाले.
कर्णधार रोहित शर्मा, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्यासह संघ व्यवस्थापन हे दौऱ्याच्या आढावा बैठकीचा भाग होते. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जूनमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
सामान नेण्यालाही येणार मर्यादा?
दोन नियमांव्यतिरिक्त आणखी एका नियमाचा समावेश होऊ शकतो. तो म्हणजे खेळाडूंच्या सामनाचे शुल्क भरण्याचा नियम. खेळाडूंचे सामान १५० किलोपेक्षा जास्त असल्यास बीसीसीआय अतिरिक्त सामानाचे शुल्क भरणार नाही. खेळाडूंना ते पैसे द्यावे लागतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.