काढलं नाही, मीच निघाले! बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडल्यावर रिद्धिमा पाठकचा खुलासा, म्हणाली - ‘माझ्यासाठी देश सर्वप्रथम’

काही माध्यमांमध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) रिद्धिमा पाठकला बीपीएलच्या होस्टिंग पॅनलमधून वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विशेषतः पाकिस्तानी आणि बांगलादेशी नेटकऱ्यांकडून याला खतपाणी घातले जात होते.
काढलं नाही, मीच निघाले! बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडल्यावर रिद्धिमा पाठकचा खुलासा, म्हणाली - ‘माझ्यासाठी देश सर्वप्रथम’
Published on

भारतीय क्रीडा सादरकर्ती (स्पोर्ट्स प्रेझेंटर) रिद्धिमा पाठक हिने बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) मधून बाहेर पडण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर मौन सोडले आहे. आपल्याला बीपीएलच्या सादरीकरण पॅनलमधून काढून टाकण्यात आलेले नसून, भारत-बांगलादेशमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे आपण स्वतःहून या भूमिकेतून माघार घेतल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

काही माध्यमांमध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) रिद्धिमा पाठकला बीपीएलच्या होस्टिंग पॅनलमधून वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विशेषतः पाकिस्तानी आणि बांगलादेशी नेटकऱ्यांकडून याला खतपाणी घातले जात होते. या पार्श्वभूमीवर रिद्धिमा पाठक हिने सोशल मीडियावर निवेदन जारी करत स्पष्ट भूमिका मांडली. “माझ्यासाठी देश सर्वप्रथम आहे. बीपीएल आयोजकांनी मला काढून टाकलेले नाही. मी स्वतःहून या स्पर्धेतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे,” असे तिने ठामपणे सांगितले. क्रिकेटबद्दलचा आपला आदर आणि प्रेम कायम असल्याचेही तिने नमूद केले. याबबात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

माझ्यासाठी माझा देश नेहमीच सर्वप्रथम

“सत्य महत्त्वाचे आहे. गेल्या काही तासांपासून, मला बीपीएलमधून ‘ड्रॉप’ करण्यात आले असल्याचे कथानक पसरवले जात आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. हा निर्णय माझा वैयक्तिक होता. मी स्वतःहून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी माझा देश नेहमीच सर्वप्रथम आहे आणि इतर कशाही पेक्षा क्रिकेट माझ्या सर्वाधिक महत्त्वाचे आहे. प्रामाणिकपणा, आदर आणि उत्कटतेसह अनेक वर्षे या खेळाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. ते कधीही बदलणार नाही. प्रामाणिकता, स्पष्टता आणि खेळाच्या भावनेसाठी मी कायम उभी राहीन. मला पाठिंबा देण्यासाठी संपर्क साधलेल्या सर्वांचे आभार. तुमचे संदेश तुम्हाला वाटते त्यापेक्षा कितीतरी अधिक मोलाचे आहेत. क्रिकेटला सत्य हवेच. बस्स. यावर माझ्याकडून आणखी कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही.” असे रिद्धिमाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राजकीय तणाव आणि बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर होणारे हल्ले यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. बीसीसीआयने यंदाच्या आयपीएल हंगामातील बांगलादेशचा एकमेव खेळाडू मुस्तफिजूर रहमानला बाहेर काढल्यानंतर आयपीएलच्या प्रक्षेपणावरही बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, भारतात होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठीही आपला संघ पाठवण्यास नकारघंटा दर्शवली आहे.

काढलं नाही, मीच निघाले! बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडल्यावर रिद्धिमा पाठकचा खुलासा, म्हणाली - ‘माझ्यासाठी देश सर्वप्रथम’
भारतातच खेळा, नाहीतर गूण गमवा! ICC चा बांगलादेशच्या मागणीला नकार, सुरक्षेला धोक्याचा दावाही फेटाळला - रिपोर्ट
logo
marathi.freepressjournal.in