भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत रॉजर बिन्नी हे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले आशिष शेलार हे बीसीसीआयच्या खजिनदार पदासाठी उत्सुक असून, त्यांनी उमेदवारीही दाखल केली आहे.
बीसीसीआयची १८ ऑक्टोबर रोजी सर्वसाधारण वार्षिक बैठक होणार आहे. त्याचवेळी निवडणूकही होणार आहे. रॉजर बिन्नी यांच्याबरोबरच राजीव शुक्ला यांनी पुन्हा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. जय शहांनी सचिवपदासाठी, राजीव शुक्लांनी पुन्हा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या आशिष शेलार यांनी खजिनदार पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर आहे. या अर्जांची छाननी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर आहे.
दरम्यान, सौरभ गांगुली यांनी आयपीएलचे चेअरमन पद नाकारल्यानंतर सध्याचे खजिनदार अरुणसिंह धुमल यांना आयपीएल कार्यकािरणीत मोठे पद (चेअरमन) मिळण्याची शक्यता आहे.