मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे सातत्यपूर्ण अपयश हे भारतीय संघासाठी अनपेक्षित आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सपेशल अपयशी ठरलेल्या रोहित शर्माला गेल्या १० सामन्यांत फक्त एकदाच अर्धशतकी खेळी साकारता आली आहे. विराटही त्याच्याच पावलावर पाऊल टाकत आहे. त्यामुळे या जगविख्यात फलंदाजांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असतानाच, आता भारताचे माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी यांनी थेट रोहित आणि विराटने निवृत्त व्हावे, असे विधान केले आहे. जर तुम्ही कसोटीत मोठी खेळी करू शकणार नसाल तर निवृत्त व्हा, अशी थेट भूमिका घावरी यांनी घेतली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिन्ही कसोटीत कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना सहा डावांत १०० धावांचा पल्लाही ओलांडता आला नाही. रोहितने तीन कसोटीत ९१ तर विराटने ९३ धावा केल्या. “विराट, रोहितने मोठी खेळी करायलाच हव्यात. जर ते चांगली कामगिरी करू शकत नसतील तर त्यांनी आपली कसोटी कारकीर्द इथेच थांबवण्यास कोणाचीही हरकत नसावी. या दोघांनी भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे, पण जिंकण्यासाठी धावांची गरज असते, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आता भविष्यातील भारतीय संघ तयार करण्याची वेळ आली आहे. कामगिरीत सातत्य नसलेल्या खेळाडूंवर आता किती काळ अवलंबून राहणार?,” असा सवालही करसन घावरी यांनी उपस्थित केला.
करसन घावरी यांनी १९७५ ते १९८१ या कालावधीत ३९ कसोटी आणि १९ वनडे सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीविषयी ते म्हणाले की, “टीम इंडियाची कामगिरी अतिशय वाईट झाली. रोहित आणि विराटसहित भारताच्या सर्व फलंदाजांनी ज्याप्रकारे कामगिरी केली, ते पाहून व्यथित झालो. स्वत:च्याच घरच्या मैदानांवर जर आपण अशी कामगिरी करणार असू तर ऑस्ट्रेलियात काय होईल? बंगळुरूतील पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल केले गेले, पण ती कसोटी तीन दिवसांतच गमावली. हे फक्त फलंदाजांचे अपयश आले. भारताला पुरेशा धावा काढण्यात तिन्ही कसोटीत अपयश आले. बंगळुरू कसोटीत भारताचा डाव ४६ धावांवर आटोपला. पुण्यातील कसोटीत भारतीय संघ २६० धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. यशस्वी जैस्वालचा अपवाद वगळता, एकाही फलंदाजामध्ये धावांसाठी भूक दिसली नाही. रोहित, विराट, लोकेश राहुल आणि युवा फलंदाज शुभमन गिल यांनी एक-दोन वेळा मोठ्या भागीदाऱ्या रचण्याची गरज होती.”
“गोलंदाजांनाही घरच्या खेळपट्ट्यांवर फारसा प्रभाव पाडता आला नाही. कसोटी जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांचे २० विकेट्स घेण्याची आवश्यकता असते. पण भारताचे गोलंदाज मायभूमीतच अपयशी ठरले. मग आता परदेशात काय करणार, असा प्रश्न पडला आहे. आता ऑस्ट्रेलियातील मालिका रोहित आणि विराटचे भवितव्य ठरवणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
बुमरावर अतिरिक्त दडपण
मोहम्मद शमी दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. तसेच मोहम्मद सिराज फॉर्मात नाही. त्यामुळे जसप्रीत बुमरावर अतिरिक्त दडपण आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर सामोरे जाताना, नव्या गोलंदाजांना सुरुवातीला यश मिळणार नाही. त्यामुळे नवा चेंडू हाताळण्याची किमया बुमरा आणि सिराज यांनाच साधावी लागणार आहे. या अनुभवी वेगवान गोलंदाजांप्रमाणेच नवा गोलंदाज फारसा प्रभावी ठरू शकणार नाही.
रहाणे, पुजाराला एक संधी द्यावी
मधल्या फळीत तग धरू शकतील, असे फलंदाज सध्या भारताकडे नाहीत. लोकेश राहुल आणि शुभमन गिल हे अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा निवड समितीने एक वेळ विचार करण्यास हरकत नाही. निवड समितीने त्यांच्या वयाचा मुद्दा पुढे केला आहे. पण ऑस्ट्रेलियात चिवट फलंदाजी करणारे हे दोघेच आहेत, हा मुद्दा नाकारता येणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनुभवी फलंदाजांची आवश्यकता आहे. त्यामुळे रहाणे आणि पुजाराला एक संधी देण्यात यावी, असे मला वाटते, असेही करसन घावरी यांनी सांगितले.