Rohti Sharma Ranaji Competition : रोहित तब्बल १० वर्षांनी खेळणार रणजी सामना

भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसताना बीसीसीआयने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याची सक्ती सर्व खेळाडूंना लागू केली आहे.
Rohit Sharma
Rohit Sharma
Published on

मुंबई : भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसताना बीसीसीआयने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याची सक्ती सर्व खेळाडूंना लागू केली आहे. त्यामुळे आता भारताचा कर्णधार रोहित शर्मा तब्बल १० वर्षांनी मुंबईकडून रणजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. २३ जानेवारीपासून बीकेसी येथील शरद पवार अकादमीच्या मैदानावर होणाऱ्या जम्मू आणि काश्मीर संघाविरुद्धच्या साखळी लढतीसाठी आपण उपलब्ध असू, असे रोहितने स्वत:च सांगितले.

२३ ते २६ जानेवारी या काला‌वधीत हा सामना झाल्यावर ३० जानेवारीपासून मुंबईची मेघालयविरुद्ध लढत होणार आहे. या सामन्यातही रोहित खेळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. रणजी स्पर्धेतील साखळी सामने ४ दिवसांचे असतात. त्यामुळे ही लढत २ फेब्रुवारीपर्यंत लांबू शकते. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होणार असून मालिकेच्या किमान ३-४ दिवसांपूर्वी भारतीय संघ नागपूरला रवाना होणे अपेक्षित आहे.

रणजी स्पर्धेत खेळणार का, असे पत्रकार परिषदेत विचारले असता रोहितने फक्त ‘हो. मी खेळेन,’ असे म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. काही दिवसांपूर्वीच रोहित मुंबईच्या रणजी संघासह सराव करतानासुद्धा दिसला होता. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यामुळे रोहितच्या भारतीय कसोटी संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सिडनीतील पाचव्या कसोटीत रोहितने स्वत:हून संघाबाहेर राहण्याचा निर्णयही घेतला. मात्र कसोटीतून निवृत्ती पत्करण्याचा आपला मुळीच विचार नाही, असेही रोहितने त्यावेळी स्पष्ट केले होते.

logo
marathi.freepressjournal.in