अपेक्षांची पूर्तता न झाल्याने डस्काटे सहाय्यक प्रशिक्षकपद सोडणार?

भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डस्काटे यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अपेक्षांची पूर्तता न झाल्याने डस्काटे सहाय्यक प्रशिक्षकपद सोडणार?
अपेक्षांची पूर्तता न झाल्याने डस्काटे सहाय्यक प्रशिक्षकपद सोडणार?(Photo-X)
Published on

एजबॅस्टन : भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डस्काटे यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) त्यांना संघात कायम ठेवण्यास उत्सुक असले, तरी गेल्या एक वर्षातील सुमार कामगिरीमुळे वादात सापडलेले टी. दिलीप यांच्या जागी डस्काटे यांना आणण्याची त्यांची योजना रखडली आहे. नेदरलँड्सचे माजी कर्णधार असलेल्या डस्काटे यांना अद्याप बीसीसीआयकडून मुक्त करण्यात आलेले नाही. मात्र, ते पुन्हा 'आयपीएल'मध्ये परतण्यास उत्सुक असून, या संदर्भात त्यांची एका फ्रँचायझीसोबत सकारात्मक चर्चाही झाली आहे.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या जोरदार शिफारसीनंतर डस्काटे भारतीय संघात सामील झाले होते. यापूर्वी त्यांनी गंभीरसोबत ‘केकेआर’मध्ये काम केले होते. डस्काटे यांना संघात घेताना त्यांच्यावर विशेष क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही हा मुद्दा सुटू शकलेला नाही. सध्या संघात फलंदाजांच्या मार्गदर्शनासाठी सितांशू कोटक आणि स्वतः गंभीर आहेत, तर वेगवान गोलंदाजांची धुरा मॉर्ने मॉर्केल आणि फिरकीपटूंची जबाबदारी साईराज बहुतुले यांच्याकडे आहे. त्यामुळे डस्काटे यांच्याकडे कोणतीही निश्चित भूमिका उरलेली नाही. भारतीय संघ तूर्तास इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघांत एकदिवसीय मालिका सुरू आहे.

दिलीप यांच्यावर निशाणा

२०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई आणि मसाजतज्ज्ञ अरुण कानडे यांना पदावरून हटवले जाणार होते. मात्र, एका वरिष्ठ खेळाडूच्या जोरदार शिफारसीमुळे दिलीप यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. दिलीप यांच्या उपस्थितीमुळे डस्काटे यांच्यासारख्या उत्कृष्ट प्रशिक्षकाचा वापर करता आला नाही. चालू ब्रिटन दौऱ्यातील टी-२० सामन्यांदरम्यान भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत सुमार दर्जाचे झाले आहे.

दिलीप यांनी त्यांची वाढीव मुदत पूर्ण केली असून, त्यांना श्रीलंका दौऱ्यासाठी पुन्हा संघात आणल्यास आश्चर्य व्यक्त केले जाईल. आता मुख्य प्रशिक्षक गंभीर डस्काटे यांना थांबण्यासाठी कसे मनवतात, यावरच सर्व काही अवलंबून असेल. डस्काटे संघातून बाहेर पडल्यास बीसीसीआयला तूर्तास दिलीप यांच्यासोबतच काम पुढे सुरू ठेवावे लागेल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in