सॅमसन राजस्थान, अश्विन चेन्नई संघ सोडण्याची शक्यता

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन व चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी आपापला संघ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सॅमसन राजस्थान, अश्विन चेन्नई संघ सोडण्याची शक्यता
Published on

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन व चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी आपापला संघ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.

२०२६च्या आयपीएलसाठी नोव्हेंबरमध्ये ऑक्शन होणार आहे. या लिलावापूर्वी ट्रेड विंडो (खेळाडूंची अदलाबदल) खुली झाली असून संघांना आपापसात खेळाडूंची बदल करण्याची मुभा आहे. लोकप्रिय इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सॅमसनने राजस्थान संघ व्यवस्थापनाशी यासंबंधी संवाद साधला आहे. सॅमसन अन्य संघाचे प्रतिनिधित्व करण्याच्या विचारात आहे. ३० वर्षीय सॅमसन २०१८पासून राजस्थान संघाचा भाग आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थानने २०२२च्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. मात्र २०२५च्या आयपीएलपूर्वी राजस्थानने ट्रेंट बोल्ट, जोस बटलर, युझवेंद्र चहल असे खेळाडू सोडले. त्याचा परिणाम राजस्थानच्या कामगिरीवर झाला. हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी राहिला. तसेच दुखापतीमुळे सॅमसन १० सामनेच खेळू शकला. काही लढतींमध्ये रियान परागने संघाचे नेतृत्व केले.

दुसरीकडे ३८ वर्षीय अश्विनही चेन्नई संघ सोडून अन्य संघाच्या शोधात आहे. अश्विन २०२२ ते २०२४ या काळात राजस्थानचा भाग होता. त्यामुळे अश्विन पुन्हा राजस्थानकडे वळणार की लिलावात नाव नोंदवणार, हे पाहणे रंजक ठरेल. अश्विन १० वर्षांनी चेन्नईकडे परतला होता. मात्र त्याला लौकिकाप्रमाणे छाप पाडता आली नाही.

logo
marathi.freepressjournal.in