

राजकोट : अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेलासुद्धा मुकणार आहे. त्याच्या जागी लेगस्पिनर रवी बिश्नोईचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच तिलक वर्माच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत तीन एकदिवसीय व पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकत्रित खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे. दुखापतीतून सावरलेल्या शुभमन गिलचे या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले असून तोच कर्णधारपद भूषवत आहे. तसेच श्रेयस अय्यरही संघात परतला आहे. गिल मानेच्या तसेच पायाच्या दुखापतीमुळे एक महिना संघाबाहेर होता. तर श्रेयसला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांना मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय प्रकाराचा विश्वचषक थेट २०२७मध्ये असल्याने भारताकडे त्याकरिता संघबांधणी करण्यासाठी तूर्तास पुरेसा वेळ आहे.
दरम्यान, रविवारी बडोदा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताने न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात केली. याच लढतीत गोलंदाजी करताना सुंदरला छातीजवळ दुखू लागल्याने मैदान सोडावे लागले. त्याने ५ षटकांत २७ धावा दिल्या होत्या. फलंदाजीस तो निर्णायक वेळी आला व नाबाद ७ धावा करून भारताला विजयीरेषा ओलांडून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र त्यानंतर करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये सुंदरला डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे समजले.
बदोनीला मात्र प्रथमच भारतीय संघात बोलावण्यात आले आहे. आयपीएलमध्ये लखनऊकडून खेळणाऱ्या बदोनीने यंदा देशांतर्गत स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना छाप पाडली. त्याने २७ लिस्ट-ए सामन्यांत ३६.४७च्या सरासरीने ६९३ धावा केल्या आहेत. तसेच यंदा रणजी स्पर्धेत त्याने ५७च्या सरासरीने धावा केल्या. तो उजव्या हाताने फिरकी गोलंदाजीही करू शकतो. बदोनीला थेट संघात स्थान मिळणार का, याकडे लक्ष असेल.
दरम्यान, नितीश रेड्डीला भारताच्या एकदिवसीय संघात सातत्याने स्थान देण्याची गरज आहे. त्याला अनेक जण कमी लेखत आहेत. तसेच त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा, आकाश चोप्रा यांनी नाोंदवले.
भारताच्या के. एल. राहुलने (९२ चेंडूंत नाबाद ११२ धावा) साकारलेल्या शतकावर न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलचे (११७ चेंडूंत नाबाद १३१ धावा) शतक भारी ठरले. भारताच्या गोलंदाजांनी सुमार मारा करून त्यास हातभार लावला. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ७ गडी व १५ चेंडू राखून वर्चस्व गाजवले. याबरोबरच न्यूझीलंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे रविवारी रंगणाऱ्या तिसऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.