शुभमन गिलकडे कसोटी नेतृत्वाची धुरा; इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचं चित्र आज स्पष्ट झालं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली असून, युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
शुभमन गिलकडे कसोटी नेतृत्वाची धुरा; इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा
Published on

भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचं चित्र आज स्पष्ट झालं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली असून, युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ही घोषणा आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवड समिती प्रमुख आणि माजी अष्टपैलू अजित आगरकर यांनी केली.

रोहित शर्माकडून सूत्र गिलकडे -

भारतीय संघाचा आतापर्यंतचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा याने ७ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितची इंग्लंडविरुद्धची आगामी कसोटी मालिका त्याची शेवटची असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याने इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून या प्रारूपाला अलविदा म्हटले.

यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या दिग्गज खेळाडूने, विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची बातमी समोर आली. कोहलीने आपला निर्णय एप्रिल महिन्यातच BCCIला कळवला होता, असे अजित आगरकर यांनी स्पष्ट केले.

गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी, पंत उपकर्णधार

गिलच्या नावाची घोषणा करताना आगरकर म्हणाले, "शुभमन गिल हा कसोटी संघाचा कर्णधार असेल, आणि ऋषभ पंत उपकर्णधार म्हणून काम पाहिल. पंतने आयपीएल २०२५ मध्ये प्रभावी पुनरागमन केल्यानंतर पुन्हा एकदा संघात महत्त्वाची भूमिका बजावण्याची तयारी दर्शवली आहे.

कर्णधारपदासाठी जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांची नावे चर्चेत होती. मात्र बुमराहबाबत आगरकर यांनी स्पष्ट केले की, "जसप्रीत बुमराह सर्व कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे नियमित नेतृत्वाची गरज होती." केएल राहुलच्या नावाकडेही पाहिले गेले, परंतु अंतिमतः निवड समितीने गिलवर विश्वास दाखवला. गोलंदाज मोहम्मद शमी याची तब्येत अजूनही ठीक नाही. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली नाही.

इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेची सुरुवात

भारताचा इंग्लंड दौरा २० जूनपासून सुरू होणार असून, लीड्स क्रिकेट स्टेडियमवर पहिली कसोटी खेळली जाणार आहे. ही पाच सामन्यांची महत्त्वाची मालिका असेल, जिथे नव्या नेतृत्वात भारतीय संघाची कसोटी लागणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ

शुभमन गिल (कर्णधार)

ऋषभ पंत (उपकर्णधार)

यशस्वी जयस्वाल

केएल राहुल

साई सुदर्शन

अभिमन्यू ईश्वरन

जसप्रीत बुमराह

मोहम्मद सिराज

प्रसिद्ध कृष्णा

अर्शदीप सिंग

आकाश दीप

कुलदीप यादव

करुण नायर

नितीश रेड्डी

रवींद्र जडेजा

ध्रुव जुरेल

वॉशिंग्टन सुंदर

शार्दुल ठाकूर

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

सराव सामना - १३ जून - बेकेनहॅम

पहिली कसोटी - २० जून - लीड्समधील हेडिंग्ले मैदान

दुसरी कसोटी - २ जुलै - बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदान

तिसरी कसोटी - १० जुलै - लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम

चौथी कसोटी - २३ जुलै मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदान

पाचवी कसोटी - ३१ जुलै - द ओव्हल मैदान

ही पाच सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघाच्या नव्या नेतृत्वाखाली खेळली जाणार असून, क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक महत्त्वाची आणि रोमांचक मालिका ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in