

नवी दिल्ली : हरमनप्रीत कौर हिने तिन्ही प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने महाराष्ट्राच्या स्मृती मानधना हिची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
गुवाहाटी येथे बीसीसीआय सचिव देवजित सैकिया, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि स्मृती मानधना यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर हरमनप्रीतने आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली. तसेच झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या टी-२० व एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्राची ३० वर्षीय डावखुरी सलामीवीर व गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला संघाची उपकर्णधार असलेली स्मृती आधीपासूनच कर्णधारपदासाठी आघाडीची दावेदार मानली जात होती. बीसीसीआयच्या सूत्रानुसार, हरमनप्रीतला एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व पुढेही करायचे होते. मात्र, बोर्डाला तिन्ही प्रकारांत नेतृत्वबदल हवा होता. त्यामुळे स्मृतीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. हरमनप्रीत हिने आपला निर्णय जाहीर करताना भविष्यात केवळ खेळाडू म्हणून खेळत राहण्याचा संकल्प केला असून, ती दोन्ही मालिकांसाठी निवडलेल्या संघात समाविष्ट आहे. आतापर्यंत हरमनप्रीत जायबंदी असली किंवा अनुपस्थितीत असली, तर स्मृतीच भारताचे नेतृत्व करायची. स्मृतीच्या नेतृत्वात बंगळुरूने दोन वेळा (२०२४, २०२६) महिलांच्या डब्ल्यूपीएलचे जेतेपद मिळवले आहे.
२०१३ पासून भारतीय संघाचा भाग असलेली स्मृती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा अनुभव सोबत घेऊन येत असून तिने विविध प्रकारांत संघाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे बीसीसीआयने म्हटले.
झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी घरगुती मालिकेसाठी शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा अनुक्रमे टी-२० आणि एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आल्या आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका १६, १८ आणि २० ऑक्टोबर रोजी रायपूर येथे खेळवली जाईल. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका वडोदरा येथे २३, २५ आणि २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
टी-२० संघातून प्रतिक्रा रावल हिला वगळण्यात आले असून, त्यांच्या जागी निक्की प्रसाद, मिन्नू मणी, अनुष्का शर्मा आणि जिंतामणी कलिता यांना स्थान देण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत खेळले होते. एकदिवसीय संघात प्रतिक्रा रावल आणि हरलीन देओल यांना मधल्या फळीत संधी मिळाली आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात स्नायूंच्या दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर राहिलेली जेमिमा रॉड्रिग्ज अजूनही संघाबाहेरच आहे. तसेच ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्धच्या सामन्यात सहा बळी घेणारी वैष्णवी शर्मा हिच्यासह तेजल हसबनीस आणि सायली सातघरे यांनाही एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे.
टी-२० संघ
स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा (उपकर्णधार), निक्की प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, रिचा घोष, गुणालन कमलिनी, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतामणी कलिता, मिन्नू मणी.
एकदिवसीय संघ
स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, तेजल हसबनीस, रिचा घोष, यास्तिका भाटिया, वैष्णवी शर्मा, नंदिनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड, सायली सातघरे, रेणुका ठाकूर