एकदिवसीय प्रकारात स्मृती ठरली सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

महिलांच्या एकदिवसीय प्रकारांतील आयसीसी पुरस्कारांमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने बाजी मारली.
एकदिवसीय प्रकारात स्मृती ठरली सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
Published on

दुबई : महिलांच्या एकदिवसीय प्रकारांतील आयसीसी पुरस्कारांमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने बाजी मारली. महाराष्ट्राची २८ वर्षीय डावखुरी सलामीवीर स्मृतीने २०१८नंतर कारकीर्दीत दुसऱ्यांदा एकदिवसीय प्रकारातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरण्याचा मान मिळवला, हे विशेष.

भारतीय संघाची उपकर्णधार असलेल्या स्मृतीने २०२४ या वर्षातील १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतक आणि ३ अर्धशतकांसह ७४७ धावा केल्या. तिची सरासरी ५७.४६ इतकी होती. गतवर्षी स्मृतीनेच एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक धावा केल्या. तिने दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वर्ड, इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट आणि वेस्ट इंडिजची हायली मॅथ्यूज यांच्यावर सरशी साधताना हा पुरस्कार पटकावला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने ३-० असे यश मिळवले. त्यापैकी दोन सामन्यांत स्मृतीने शतके झळकावली होती.

दोन वेळा एकदिवसीय प्रकारात सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणाऱ्या स्मृतीने यापूर्वी वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा (तिन्ही प्रकारांत मिळून) पुरस्कारही काबिज केला आहे. २०१८ आणि २०२१मध्ये तिने हा बहुमान मिळवला होता. मात्र यंदा एकदिवसीय प्रकारातच स्मृतीला नामांकन लाभले.

logo
marathi.freepressjournal.in