

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या सांगलीत होणाऱ्या भव्य लग्नसोहळ्याची तयारी जोरदार सुरू होती. शुक्रवारपासून सुरू झालेल्या समारंभात संगीत, हळदीचे रंग, दोन्ही कुटुंबांचा उत्साह आणि क्रिकेट-बॉलीवुड जगताचा सहभाग दिसून येत होता. मात्र लग्न मुहूर्ताला काही तास बाकी असतानाच परिस्थिती अचानक बदलली आणि लग्न अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर घडलेल्या घटनांनी चाहत्यांमध्ये गोंधळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
लग्नसोहळ्याची सुरुवात रंगतदार
शुक्रवारी सांगलीतल्या एका रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा सुरू झाला आणि शनिवारी संगीत-हळदीचे कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडले. व्हिडिओंमध्ये स्मृती आणि पलाश एकत्र परफॉर्म करताना दिसत होते. पलाशने ‘गुलाबी आँखें’ आणि ‘तेनु लेके’ या गाण्यांवर दिलेला रोमँटिक परफॉर्मन्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. भारतीय महिला क्रिकेट टीममधील खेळाडूंसह पलक मुच्छल आणि कुटुंबीयांनीही कार्यक्रमात सहभागी होऊन सोहळ्याला रंगत आणली.
लग्नाला तासभर बाकी असताना धक्का
रविवारी दुपारपर्यंत सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंच सजला होता, पाहुणे येऊ लागले होते आणि लग्नसोहळा जवळ आला होता. त्याचवेळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधना ब्रेकफास्टदरम्यान अचानक बेशुद्ध पडले. हार्ट अटॅकसारखी लक्षणे जाणवताच एंब्युलन्स बोलावून त्यांना सांगलीतील सर्वहित हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
स्मृतीच्या मॅनेजर तुहिन मिश्रा यांनी सांगितले की, श्रीनिवास मंधना यांची प्रकृती सतत बिघडत असल्याने स्मृतीने वडील बरे होईपर्यंत लग्न स्थगित करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या मते, हा त्रास लग्नसोहळ्याच्या ताणामुळे वाढला असावा.
भावनिक ताणानंतर पलाशही हॉस्पिटलमध्ये
लग्न स्थगित झाल्यानंतर पलाश आणि त्याचे कुटुंब सांगलीहून मुंबईला निघाले. भावनिक धक्क्यामुळे आणि थकव्यामुळे पलाशची तब्येतही बिघडली आणि त्याला मुंबईच्या गोरेगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पलाशच्या आई अमिता मुच्छल यांनी सांगितले की, लग्न थांबल्यानंतर पलाश चार तास रडत होता आणि स्मृतीच्या वडिलांशी असलेली त्याची जवळीक पाहता, लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय त्यानेच प्रथम घेतला. काही उपचारांनंतर पलाशला डिस्चार्ज देण्यात आला असून तो सध्या घरी विश्रांती घेत आहे.
कुटुंबाचा प्रायव्हसीचा आग्रह
सोमवारी सकाळी पलक मुच्छलने इंस्टाग्रामवर निवेदन दिले. तिने स्मृतीच्या वडिलांच्या आरोग्यामुळे लग्न स्थगित केल्याचे सांगत, या संवेदनशील काळात कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर करण्याची विनंती केली.
स्मृतीने सर्व लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले
सोमवारी संध्याकाळी स्मृतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एंगेजमेंट फोटो, पूर्वलग्नविधींचे व्हिडिओ आणि लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट्स डिलीट केल्या. तिच्या क्रिकेट सहकाऱ्यांनीही त्यांच्या स्टोरीज आणि व्हिडिओ हटवले. मात्र पलाशच्या प्रोफाइलवर एंगेजमेंटचे पोस्ट आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवरील प्रपोजलचा व्हिडिओ अद्याप उपलब्ध आहे.
चाहत्यांनी सोशल मीडियावर स्मृतीच्या वडिलांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि जोडप्याला भावनिक पाठिंबा दिला.
लग्नाची नवी तारीख निश्चित नाही
स्मृती किंवा पलाश यांनी अद्याप कोणतेही वैयक्तिक निवेदन दिलेले नाही. लग्न पुढे कधी होणार याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. स्मृतीचे वडील अजूनही हॉस्पिटलमध्ये ऑब्झर्व्हेशनखाली असून, कुटुंबीयांनी गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे.