

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे. स्मृतीने आज (दि.७) स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली. स्मृतीनंतर, पलाश मुच्छलनेही इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. लग्न स्थगित झाल्यापासून स्मृती आणि पलाश दोघेही सोशल मीडियापासून दूर होते.
'लग्न रद्द करण्यात आलं आहे'... स्मृती मानधनाची सोशल मीडिया पोस्ट
स्मृती मानधनाने इन्स्टाग्रावर पोस्ट मध्ये लिहिले की, "गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत आणि मला वाटते की, सध्या मी याबद्दल बोलणे गरजेचे आहे. मी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि मला माझे आयुष्य खाजगी ठेवायला आवडते, परंतु मी हे स्पष्ट करू इच्छिते की लग्न रद्द करण्यात आले आहे."
दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा
तिने पोस्टमध्ये म्हटले, "मी हे प्रकरण इथेच संपवते आणि मी तुम्हा सर्वांनाही तेच करण्याची विनंती करते. मी सर्वांना विनंती करते की दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला वेळ द्या, जेणेकरून आम्ही या परिस्थितीतून सावरून पुढे जाऊ शकू."
देशाचे प्रतिनिधित्व करणे हेच माझे लक्ष्य
"मला वाटते की, आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक मोठा उद्देश असतो आणि माझ्यासाठी तो उद्देश नेहमीच सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे राहिला आहे. मला आशा आहे की, मी जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत भारतासाठी खेळत राहीन, ट्रॉफी जिंकेन. माझे लक्ष्य नेहमीच हे राहिल. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता, पुढे जाण्याची वेळ आली आहे." असे तिने पोस्टच्या शेवटी म्हटले.
पलाश मुच्छलनेही इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
स्मृती मानधनानंतर पलाश मुच्छलनेही इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले की, "मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि वैयक्तिक संबंधांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी सर्वात पवित्र असलेल्या गोष्टीबद्दल निराधार अफवा पसरवल्या जात आहेत आणि लोक इतक्या सहजपणे त्यावर प्रतिक्रिया देतात हे पाहणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा आहे आणि मी माझ्या तत्वांवर ठाम राहून या वेळेला सामोरे जाईन."
आपले शब्द लोकांना दुखावू शकतात
पुढे त्याने म्हटले, "मला खरोखर आशा आहे की आपण, एक समाज म्हणून, ज्यांचे सूत्र कधीही ओळखले जात नाहीत अशा गॉसिप आणि अफवांवर आधारित एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी थांबायला शिकू. आपले शब्द लोकांना दुखावू शकतात. जेव्हा आपण या गोष्टींबद्दल विचार करतो तेव्हा जगभरातील अनेक लोकांना यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे.."
...तर कायदेशीर कारवाई होईल
"माझी टीम माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आणि बदनामीकारक मजकूर लिहिणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करेल. या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्यांचे आभार."
फोटोज डिलीट केल्याने चर्चांना उधाण
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न २३ नोव्हेंबरला होणार होतं. परंतु, लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामुळे, लग्नसोहळा स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर, स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लग्नसोहळ्याचे सर्व फोटोज डिलीट केले. तर पलाशचे एका मुलीसोबतचे चॅटही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर, पलाशने स्मृतीला धोका दिल्यामुळे लग्न स्थगित करण्यात आलं आहे, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली होती. आता स्मृती आणि पलाशने केलेल्या पोस्टमुळे त्यांच्यातील नातं संपल्याचं जाहीर झालं आहे