धोनीने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी किंवा निवृत्त व्हावे! IPLच्या आगामी हंगामापूर्वी माजी क्रिकेटपटूंचा चेन्नईच्या ज्येष्ठ खेळाडूला सल्ला

चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनीने यंदाच्या हंगामात किमान सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी अथवा सन्मानाने निवृत्त होत युवा खेळाडूंना संधी द्यावी, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्सने व्यक्त केले आहे.
धोनीने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी किंवा निवृत्त व्हावे! IPLच्या आगामी हंगामापूर्वी माजी क्रिकेटपटूंचा चेन्नईच्या ज्येष्ठ खेळाडूला सल्ला
(संग्रहित फोटो)
Published on

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनीने यंदाच्या हंगामात किमान सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी अथवा सन्मानाने निवृत्त होत युवा खेळाडूंना संधी द्यावी, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्सने व्यक्त केले आहे.

२८ मार्चपासून आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होणार असून चेन्नईचा संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध ३० तारखेला सलामीचा सामना खेळणार आहे. मुख्य म्हणजे ४४ वर्षीय धोनी यंदाही चेन्नईकडून खेळणार आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून धोनीचा शेवटचा हंगाम कोणता असणार, याविषयी तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तसेच धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे कधी-कधी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येत आहे. अनेकदा शेवटच्या षटकातील त्याची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत. तसेच आधीचे फलंदाज झटपट बाद व्हावेत, अशी प्रार्थनाही करताना दिसतात.

यंदा मात्र चेन्नईने अनेक युवा खेळाडूंवर विश्वास दर्शवला आहे. तसेच ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघात संजू सॅमसन सारखा प्रतिभावान यष्टिरक्षक व सलामीवीर दाखल झाल्याने धोनी या हंगामाच्या अखेरपर्यंत निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चेन्नईकडे ऋतुराज, आयुष म्हात्रे, सॅमसन, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, प्रशांत वीर आणि कार्तिक सोलंकी असे युवा खेळाडू यंदा आहेत. अशा स्थितीत धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, हे पाहणे रंजक ठरेल. लिलावापूर्वी चेन्नईने रवींद्र जडेजा व सॅम करन या खेळाडूंना राजस्थानकडे पाठवून सॅमसनला संघात आणले.

“गेल्या २-३ वर्षांत धोनी फलंदाज म्हणून त्याचे पूर्ण योगदान देऊ शकलेला नाही, असे मला वाटते. धोनी चेन्नई संघासाठी मोलाचा आहे, यात शंका नाही. त्याचे मैदानावर असणेच महत्त्वाचे आहे. मात्र सध्या चेन्नईच्या फलंदाजीची ताकद बघता धोनीने किमान पाचव्या किंवा सहाव्या स्थानी फलंदाजीस येणे गरजेचे आहे. अन्यथा संघाचा ताळमेळ बिघडू शकतो,” असे एबी म्हणाला.

“धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीस आला, तर चेन्नईला दोन्ही अष्टपैलूंना सहाव्या किंवा सातव्या स्थानी संधी देता येईल. तसेच यष्टिरक्षणासाठी सॅमसनचा पर्यायही आता चेन्नईकडे उपलब्ध आहे. यंदा चेन्नईचा संघ कागदावर समतोल वाटत असून ते बाद फेरी नक्कीच गाठू शकतात. यासाठी धोनीचे फलंदाज तसेच ऋतुराजचा मार्गदर्शक म्हणून योगदान मोलाचे असेल,” असेही एबीने सांगितले.

कदाचित हा धोनीचा अखेरचा हंगाम : पठाण

भारताचा माजी वेगवान गोलंदाज व समालोचक इरफान पठाणने कदाचित यंदाचा हंगाम धोनीच्या आयपीएल कारकीर्दीतील अखेरचा असेल, असे मत व्यक्त केले. “चेन्नईच्या संघातील खेळाडू पाहिले, तर आपल्याला कल्पना येईल की हा हंगाम धोनीसाठी अखेरचा ठरू शकतो. तो नक्कीच निवृत्तीनंतरही संघासोबत असेल. मात्र सध्या चेन्नईकडे पर्यायी यष्टिरक्षक व युवा फलंदाज सज्ज आहेत, जे धोनीची जागा घेऊ शकतात. धोनीचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही, हे खरे असले, तरी काळानुसार चेन्नई संघालाही पुढे जाणे गरजेचे आहे,” असे पठाण म्हणाला.

कोलकाताचा हर्षित संपूर्ण हंगामाला मुकणार?

कोलकाता नाइट रायडर्स संघाचा गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकण्याची शक्यता बळावली आहे. अद्याप याविषयी कोलकाता संघाने अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र रविवारी नवी दिल्ली येथील बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यासाठी हर्षित दोन्ही हातात वॉकिंग स्टीक पकडून आला. गेल्या महिन्यात गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकाला मुकला. तसेच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यातून सावरण्यासाठी हर्षितला आणखी २ महिन्याचा कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत हर्षित कधी परतेल, हे सांगता येणार नाही. २८ मार्चपासून आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होणार असून साधारणपणे ३१ मेपर्यंत तो संपेल, असे समजते.

logo
marathi.freepressjournal.in