
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हार्दिक पांडाच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर हार्दिक बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याची उपकर्णधार नियुक्ती केली आहे.
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर पांड्याला न्यूझीलंड, इंग्लड आणि श्रीलंकेविरुद्ध पुनरागमन करता आलं नाही. यानंतर आज(४ ऑक्टोबर) आयसीसीने पांड्या यापूढे वर्ल्डकप खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पांड्या बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ निवड समितीने केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला अद्यापही दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅडविरुद्ध खेळायचं आहे.
केएल राहुलकडे देखील संघाचं नेतृत्व करण्याचा वराच अनुभव आहे. त्याने आतापर्यंत ९ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. ज्यापैकी संघाने ६ सामने जिंकले आहेत. आणि ३ सामने गमावले आहेत. याशिवाय केएल राहुल यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ९७ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. तो सामना संघाला जिंकून देण्यात केएल राहुलने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी सकाळी केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. केएल राहुल यष्टीरक्षण म्हणून आतापर्यंत गोलंदाजांच्या मीटिंगमध्ये भाग घेत होता. यानंतर उपकर्णधार म्हणून त्याचा गोलंदाज आणि फलंदाजांसह सर्व संघ मीटिंगमध्ये सहभाग असेल. त्याच बरोबर संघ व्यवस्थापनही केएल राहुलसोबत प्रत्येक विषयावर चर्चा करणार आहे.