बलाढ्य चेन्नईविरुद्ध दिल्लीचा कस लागणार; पृथ्वी शॉ याला संधी मिळण्याची शक्यता

चेन्नईचा संघ सर्व आघाड्यांवर सरस वाटत असला तरी प्रतिस्पर्धी दिल्ली संघाचे प्रशिक्षकपद रिकी पाँटिंग भूषवत आहे, याकडे चेन्नईला कानाडोळा करून चालणार नाही. जीएमआर आणि जेएसडब्ल्यू यांच्याकडे दिल्लीची मालकी असली तरी लिलावात खेळाडूंवर बोली लावताना त्यांनी अनेक चुका केल्या आहेत.
बलाढ्य चेन्नईविरुद्ध दिल्लीचा कस लागणार; पृथ्वी शॉ याला संधी मिळण्याची शक्यता
Published on

विशाखापट्टणम : दिल्ली कॅपिटल्सला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत विजयाचे खाते खोलता आलेले नाही. त्यातच त्यांचा तिसरा सामना रविवारी बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. चेन्नईने पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे या लढतीत दिल्लीची कसोटी लागणार आहे. त्यातच दिल्लीचे सलामीवीर फारशी कमाल दाखवू न शकल्यामुळे फलंदाजी भक्कम करण्यासाठी चेन्नईविरुद्ध सलामीवीर पृथ्वी शॉ याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

टी-२० प्रकारात दिल्लीला गेल्या चार सामन्यांत चेन्नई सुपर किंग्जचा अडथळा पार करता आलेला नाही. त्यापैकी दिल्लीला ९१, २७ आणि ७७ धावांनी म्हणजेच मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. तीन सामन्यांत मोठे पराभव पत्करल्यामुळे दिल्लीपेक्षा चेन्नईचेच पारडे जड मानले जात आहे. तरीही दिल्लीने चेन्नईविरुद्ध विजय मिळवला तर तो या स्पर्धेतील धक्कादायक निकाल मानला जाईल.

चेन्नईचा संघ सर्व आघाड्यांवर सरस वाटत असला तरी प्रतिस्पर्धी दिल्ली संघाचे प्रशिक्षकपद रिकी पाँटिंग भूषवत आहे, याकडे चेन्नईला कानाडोळा करून चालणार नाही. जीएमआर आणि जेएसडब्ल्यू यांच्याकडे दिल्लीची मालकी असली तरी लिलावात खेळाडूंवर बोली लावताना त्यांनी अनेक चुका केल्या आहेत. त्याचाच परिणाम त्यांना भोगावा लागत आहे. पाँटिंग आणि दिल्लीचा क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी देशांतर्गत खेळाडूंवर लक्ष दिले असले तरी त्यांच्यात गुणवत्तेची कमतरता जाणवत आहे.

त्याउलट चेन्नईने समीर रिझवी या बिगरमानांकित खेळाडूला ८.४० कोटी रुपयांना विकत घेतले. रिझवीने पंजाब किंग्सविरुद्ध दोन खणखणीत षटकार ठोकले, त्यामुळे चेन्नईचा संघ चांगल्या पण अननुभवी खेळाडूंना संघात विकत घेण्याविषयी किती तयारीत होता, हे दिसून येते. सर्व फ्रँचायझींपैकी दिल्लीची गुणवत्ताशोध मोहीम पूर्णपणे फसली असली त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागत आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या रिकी भुईने नुकत्याच आटोपलेल्या रणजी मोसमात सर्वाधिक ९०२ धावा फटकावल्या असल्या तरी दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरच्या वेगवान माऱ्यासमोर तो सपेशल अपयशी ठरला. दोन्ही सामन्यांत त्याला छाप पाडता आली नाही.

मुंबईकर पृथ्वी शॉने रणजी मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यात स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र त्याच्या फिटनेसविषयी पाँटिंग किती समाधानी आहेत, हे समजू शकले नाही. तसेच दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने अपघातानंतर १५ महिन्यांत पुनरागमन केले असले तरी त्याला मैदानावर स्थिरावण्यासाठी दिल्लीला जरा वेळ द्यावा लागणार आहे. दिल्लीच्या सर्व अपेक्षा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरकडून आहेत. मात्र राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ४९ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता त्यालाही मोठी खेळी साकारता आलेली नाही. मिचेल मार्शच्या कामगिरीत सातत्य दिसून येत नाही. त्यामुळे पृथ्वी शॉला संधी मिळाली तर दिल्लीची फलंदाजी मजबूत होईल. त्याचबरोबर दिल्लीच्या गोलंदाजीची जबाबदारी मुस्तफिझूर रहमान, दीपक चहर, मथीशा पथिराना यांच्यावर आहे. दिल्लीकडे ताकदवान फटके लगावणाऱ्या खेळाडूंची उणीव जाणवत आहे. ऋषभ पंत अपयशी ठरल्यास, त्यांना शाय होप किंवा त्रिस्तान स्टब्स यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

चेन्नईने यावर्षी नेतृत्वात बदल केले असून महेंद्रसिंह धोनीऐवजी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मात्र धोनीसारखी अदृश्य शक्ती चेन्नईच्या पाठीशी कायम आहे. डॅरेल मिचेलची भन्नाट गोलंदाजी तसेच रचिन रवींद्रचे गोलंदाजी आणि फलंदाजीत मिळत असलेले योगदान यामुळे चेन्नईचा संघ पहिल्या दोन्ही सामन्यांत वरचढ ठरला.

इशांत-रचिन जुगलबंदी रंगणार

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला पहिल्या सामन्यात संधी मिळाली होती, त्यात त्याने दोन षटकांत १ बळी मिळवत छाप पाडली होती. त्याचबरोबर चेन्नईचा रचिन रवींद्र सध्या तुफान फॉर्मात असून त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ३७ धावांची तर गुजरात टायटन्सविरुद्ध ४६ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे या सामन्यात इशांत शर्मा आणि रचिन रवींद्र यांच्यात जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in