वरुणची मुसंडी; तिलक दुसऱ्या स्थानी; आयसीसी टी-२० क्रमवारी

भारताचा डावखुरा फलंदाज तिलक वर्माने बुधवारी आयसीसीच्या जागतिक टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
वरुणची मुसंडी; तिलक दुसऱ्या स्थानी; आयसीसी टी-२० क्रमवारी
Published on

नवी दिल्ली : भारताचा डावखुरा फलंदाज तिलक वर्माने बुधवारी आयसीसीच्या जागतिक टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तसेच गोलंदाजांच्या क्रमवारीत फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने तब्बल २५ स्थानांनी मुसंडी मारून थेट पाचवा क्रमांक काबिज केला.

तिलकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबरमध्ये सलग दोन शतके झळकावली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध चेन्नईत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. त्यामुळे आता तिलक ८३२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड ८५५ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल अनुक्रमे चौथ्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडच्या फिल सॉल्टची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिद ७१८ गुणांसह अग्रस्थानी आहे. मात्र गेल्या ३ सामन्यांत १० बळी मिळवणाऱ्या वरुणने ३०व्या क्रमांकावरून झेप घेत थेट पाचवा क्रमांक पटकावला आहे. याव्यतिरिक्त, अर्शदीप सिंग व रवी बिश्नोई या भारतीय गोलंदाजांनी अव्वल १० खेळाडूंतील स्थान टिकवले आहे. अर्शदीप ६६४ गुणांसह नवव्या, तर बिश्नोई ६५९ गुणांसह १०व्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेत भारतीय संघ तूर्तास २-१ असा आघाडीवर आहे. शुक्रवारी पुणे येथे चौथी, तर रविवारी मुंबईत पाचवी लढत होईल.

logo
marathi.freepressjournal.in