विश्वविजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून ५ कोटींचे बक्षीस

सलग दुसऱ्यांदा महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवणाऱ्या भारतीय युवतींच्या संघाचा बीसीसीआयकडून गौरव करण्यात येणार आहे.
विश्वविजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून ५ कोटींचे बक्षीस
एक्स @narendramodi
Published on

नवी दिल्ली : सलग दुसऱ्यांदा महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवणाऱ्या भारतीय युवतींच्या संघाचा बीसीसीआयकडून गौरव करण्यात येणार आहे. या संघासाठी बीसीसीआयने ५ कोटींचे पारितोषिक जाहीर केले आहे.

निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून जगज्जेतेपद काबिज केले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ९ गडी राखून धूळ चारली. त्रिशा गोंगडी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. या जेतेपदानंतर भारतीय संघावर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. २०२३मध्ये शफाली वर्माच्या नेतृत्वात भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता.

“मलेशियामध्ये टी-२० विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. बीसीसीआयकडून विश्वविजेत्या संघाला ५ कोटींचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षक नूशीन अल खदीर व अन्य सहायक्कांनाही गौरवण्यात येणार आहे,” असे बीसीसीआयने जाहीर केले.

भारतीय युवतींचा संघ हा कोणत्याही आयसीसी स्पर्धेतील पहिल्या दोन पर्वांचे (२०२३, २०२५) जेतेपद मिळवणारा विश्वातील दुसराच संघ ठरला. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या पुरुष संघाने १९७५ आणि १९७९मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद काबिज केले होते. या दोघांव्यतिरिक्त आजवर कोणत्याही पुरुष व महिला संघाला १९ वर्षांखालील, एकदिवसीय, टी-२०, चॅम्पियन्स ट्रॉफी अथवा कसोटी प्रकारात अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भारताने मिळवलेले जेतेपद खास आहे. मात्र या जेतेपदातून प्रेरणा घेत भारताचा वरिष्ठ महिला संघही लवकरच भविष्यात आयसीसी जेतेपद मिळवेल, अशी चाहत्यांना आशा आहे.

भारताच्या चौघी आयसीसीच्या संघात

आयसीसीने निवडलेल्या टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंच्या संघात भारताच्या चौघींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली त्रिशा गोंगडी, सलामीवीर कमलिनी गुनालन, डावखुरी फिरकीपटू आयुषी शुक्ला आणि स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणारी वैष्णवी शर्मा यांचा समावेश आहे. या संघाचे नेतृत्व मात्र दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायले रेनेककडे सोपवण्यात आले आहे. आफ्रिकेच्या तीन खेळाडू या संघात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in