Vinesh Phogat : भारताला मोठा धक्का! सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेश फोगट अपात्र; फक्त काही ग्रॅम जास्त वजनामुळे स्वप्न भंगलं

बुधवारी अंतिम फेरीपूर्वी केवळ काही ग्रॅम वजन जास्त असल्याने विनेश फोगाटला अंतिम फेरीसाठी अपात्र ठरवण्यात आलं.
Vinesh Phogat
सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेश फोगट अपात्रCanva
Published on

भारताची 'धाकड गर्ल' म्हणजेच महिला पैलवान विनेश फोगाट हिच्याकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा केली जात होती. मंगळवारी महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेशने पहिल्याच फेरीत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती तसेज जगज्जेती आणि जपानची अग्रमानांकित युई सुसाकीला धूळ चारली. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही विनेशने धडाकेबाज विजयाची नोंद करताना थाटात अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीपूर्वी, आज सकाळी वजन केले असता केवळ काही ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. यामुळे विनेश फोगाटच्या ऑलिम्पिक पदक विजयाचं स्वप्न भंगलं आहे.

केवळ १०० - १५० ग्रॅम जास्त वजनाने ठरली अपात्र :

अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाटला तिच्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं होतं. विनेश ५० किलो वजनी गटातून कुस्ती स्पर्धा खेळत होती. तेव्हा या गटात सहभागी असणाऱ्या स्पर्धकांचे वजन ५० किलो असणं गरजेचं असतं. परंतु, अंतिम फेरीपूर्वी आज सकाळी करण्यात आलेल्या वजनात विनेशचं वजन हे १०० ते १५० ग्रॅम जास्त असल्याचं आढळलं. त्यामुळे समितीने विनेशला अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरवलं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिलेला आहे.

Vinesh Phogat
Paris Olympics 2024: महाराष्ट्राच्या लेकाची विजयी 'दौड'! आज फायनलमध्ये अविनाश साबळेची पदकासाठी दावेदारी

विनेश फोगाट मेडल न घेताच भारतात परतणार :

विनेश फोगाट अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्यामुळे तिला मेडल न जिंकताच भारतात परतावं लागणार आहे. विनेश अंतिम फेरीत पोहोचल्याने भारतासाठी सुवर्ण किंवा रौप्यपैकी एक पदक निश्चित होते. भारताने आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ ३ कांस्य पदकांना गवसणी घातली आहे. तर इतर क्रीडा प्रकारात पदकाची अपेक्षा असताना तेथून भारताच्या वाटेला निराशाच आली होती. विनेश ओव्हरवेटमुळे अपात्र ठरल्याने महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटाचं रौप्य पदक कोणालाही दिलं जाणार नाही. तर अंतिम सामना खेळवला जाणार नसल्याने अमेरिकेची खेळाडू ही सुवर्णपदकाची मानकरी ठरेल.

ऑलिम्पिकसाठी ३ किलो वजन केलं होतं कमी :

विनेश फोगाट ही खरंतर ५३ किलो वजनी गटाची पैलवान आहे, मात्र ऑलिम्पिकसाठी तिने ३ किलो वजन कमी केलं होतं. यानंतर ती ५० किलो वजनी गटात उतरली. मंगळवारी उपांत्य आणि उपांत्यपूर्वी खेळी दरम्यान तिचं वजन हे ५० किलो इतकंच होतं मात्र मंगळवारी रात्री तिचं वजन ५२ किलो झालं. अंतिम फेरीपूर्वी वजन कमी करण्यासाठी विनेश अख्खी रात्र झोपली नाही तिने सायकलिंग, जॉगिंग इत्यादी सर्वकाही करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर बुधवारी अंतिम फेरीपूर्वी तपासण्यात आलेल्या वजनात विनेशचं वजन हे अपेक्षेपेक्षा १०० ते १५० ग्रॅम जास्त होतं.

विनेश फोगाटची कारकीर्द :

विनेश फोगाट ही भारताची २९ वर्षीय महिला पैलवान असून तिचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला दुखापत झाली होती त्यामुळे तिला कांस्यपदक जिंकता आले नाही. तर २०२० टोकिलो ऑलिम्पिकमध्ये तिला 53 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत वेनेसा कलाडझिंस्कायाकडून पराभव पत्करावा लागला होता.

logo
marathi.freepressjournal.in