तीन वर्षांपासून कसोटीत शतक न साकारल्याने दडपण वाढत होते ; कोहलीची कबुली

तीन वर्षांपासून कसोटीत शतक न साकारल्याने दडपण वाढत होते ; कोहलीची कबुली

अहमदाबाद येथे झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीत कोहलीने १८६ धावांची खेळी साकारली.

गेल्या तीन वर्षांपासून कसोटी प्रकारात शतक न झळकावता आल्यामुळे मला अनेकदा दडपण आले. मी काही काळ फार या विचारांमध्ये गुंतलो होतो, अशी कबुली भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने दिली. अहमदाबाद येथे झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीत कोहलीने १८६ धावांची खेळी साकारली. नोव्हेंबर २०१९नंतर कोहलीचे हे कसोटीतील पहिलेच शतक ठरले.

“मी गेल्या काही सामन्यांत अनेकदा अर्धशतकाचा टप्पा ओलांडला. परंतु कसोटी सामन्यात शतक झळकावता येत नव्हते. अपेक्षांचे ओझे पेलण्यात मी कुठे तरी कमी पडत चाललो आहे. ४०-५० धावांवर असतानाच मी १५० पर्यंत मजल मारू शकतो, असे वाटायचे. परंतु तसे होत नव्हते. यामुळे अहमदाबादमधील शतक माझ्यासाठी खरंच खास आहे,” असे कोहलीने सामन्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “४०-५० धावा करून आनंद मानणाऱ्यांमधला मी नाही. कुठे ना कुठे शतक आपल्याला सातत्याने हुलकावणी देत असल्याचा विचार मनात सुरू होता. हॉटेलमध्ये भेटणाऱ्यांपासून संघाचा बस ड्रायव्हरही मला शुभेच्छा देऊन शतक पाहिजे, असेच सांगायचा. सुदैवाने आता हे ओझे माझ्या पाठीवरून उतरले आहे,” असे कोहली म्हणाला.

हार्दिककडे विश्वचषकानंतर कर्णधारपद सोपवावे- गावसकर

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले, तर एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात काही गैर नाही, असे मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. “रोहितच्या कौशल्याबाबत शंका नाही. पण २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर भविष्याच्या दृष्टीने हार्दिककडे भारताच्या टी-२० व वन-डे संघाचे नेतृत्व देऊ शकतो,” असे गावसकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in