आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय, टी-२० मालिकेतून विराटची माघार

भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्यापासून विराटने विश्रांती घेतली आहे.
आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय, टी-२० मालिकेतून विराटची माघार
Published on

नवी दिल्ली : भारताचा सर्वाधिक अनुभवी फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून माघार घेण्याचे ठरवले आहे. याबाबत त्याने बीसीसीआयला कळवले असून थेट आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट खेळणार असल्याचे समजते.

भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्यापासून विराटने विश्रांती घेतली आहे. विराट सध्या लंडनमध्ये आहे. त्याने विश्वचषकात ११ सामन्यांत सर्वाधिक ७६५ धावा केल्या. विराटलाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र तूर्तास ३५ वर्षीय विराटने मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपला थेट आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विचार करावा, असे त्याने बीसीसीआयला कळवले आहे.

भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध १० डिसेंबरपासून ३ टी-२०, तर १७ डिसेंबरपासून ३ एकदिवसीय लढती खेळणार आहे. त्यानंतर २६ डिसेंबरपासून उभय संघांतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. आफ्रिका दौऱ्यासाठी पुढील काही दिवसांतच अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती भारतीय संघाची घोषणा करणार आहे.

रोहितबाबत संभ्रम कायम

विराटने त्याचा निर्णय कळवला असला तरी कर्णधार रोहित शर्मा आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी उपलब्ध असेल की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. विराटप्रमाणेच ३६ वर्षीय रोहितही विश्वचषकानंतर विश्रांतीवर आहे. तसेच विराट व रोहित दोघेही गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर एकही टी-२० लढत खेळलेले नाहीत. वर्षभरात भारतीय संघाने प्रचंड क्रिकेट खेळल्याने या दोन्ही खेळाडूंना सध्या विश्रांती देण्यात आली आहे. रोहितसुद्धा सध्या युनायटेड किंगडम येथे कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in