
मुंबई : भारताचा प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यरचे आगामी २०२४-२५ या वर्षासाठी बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत पुनरागमन निश्चित मानले जात आहे. ३० वर्षीय मुंबईकर श्रेयसने नुकताच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक २४३ धावा करताना जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
बीसीसीआयने गतवर्षी फेब्रुवारीत श्रेयस व इशान किशन यांना वार्षिक करारातून वगळले होते. भारतीय संघाचा भाग नसल्यास खेळाडूंना त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्थानिक स्पर्धेत खेळणे अनिवार्य आहे. मात्र श्रेयसने आदेशाचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. श्रेयसने त्यावेळी याविषयी भाष्य करणे टाळले. काही दिवसांतच तो रणजी स्पर्धेत परतला. तसेच मार्चमध्ये मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली, त्यामध्ये श्रेयसने मोलाचे योगदान दिले.
मग त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल २०२४चे विजेतेपद मिळवले. इतकेच नव्हे, तर सप्टेंबरमध्ये मुंबईने श्रेयसच्या नेतृत्वात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा जिंकली. त्यामुळेच आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांत खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातील श्रेयस हा दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही श्रेयसने छाप पाडून आपले महत्त्व अधोरेखित केले. मग चॅम्पियन्स ट्रॉफीत संपूर्ण स्पर्धेत श्रेयसने चौथ्या स्थानी मोलाचे योगदान दिले. त्याने ५ सामन्यांत अनुक्रमे १५, ५६, ७९, ४५, ४८ अशा धावा केल्या. अनेकांच्या मते श्रेयसच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी होता. त्यामुळे श्रेयसवर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
आता मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत बीसीसीआय २०२४-२५ या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. या यादीत श्रेयसला अ श्रेणीत स्थान मिळू शकते. बीसीसीआयच्या करारात ‘अ+’ श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ७ कोटी, अ-श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ब-श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी, तर क-श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी वार्षिक मानधन दिले जाते.
मला फारसे महत्त्व दिले नाही!
श्रेयसने मंगळवारी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आयपीएलमध्ये त्याने कोलकाता संघासह करार न वाढवण्याच्या कारणाचा खुलासा केला. श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाताने २०२४मध्ये आयपीएल जिंकली. मात्र याचे श्रेय मला फारसे दिले गेले नाही, असे श्रेयसचे म्हणणे आहे. “आयपीएल जिंकल्यानंतर मला कर्णधार म्हणून जे श्रेय मिळणे गरजेचे होते, तितके देण्यात आले नाही. हेसुद्धा कदाचित मी कोलकाता सोडण्यामागील कारण असू शकते,” असे श्रेयस कुणाचेही नाव न घेता म्हणाला. कोलकाताचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, मार्गदर्शक गौतम गंभीर होते. प्रामुख्याने गंभीरला या विजेतेपदाचे श्रेय देण्यात आले व तो काही महिन्यांतच भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून निवडून आला.