

कोलंबो : राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर महिला विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ रविवारी आमनेसामने येत आहेत. कोलंबोच्या आर प्रेमादासा स्टेडीयममध्ये भारत आणि पाकिस्तान महिला संघांत मैदानातले युद्ध पहायला मिळणार आहे. स्पर्धेत संघर्ष करत असलेल्या पाकिस्तानच्या संघासमोर भारताचा संघ तगडा मानला जात आहे.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून भारत आणि पाकिस्तान हे महिला संघ एकूण २७ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यात २४ सामने जिंकून भारताने वर्चस्व टिकवून ठेवले आहे. पाकिस्तानने केवळ ३ टी-२० सामन्यांत विजय मिळवले आहेत.
पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत भारताने १०० टक्के यश मिळवले आहे. सर्वच्या सर्व ११ सामने जिंकण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे.
दोन्ही संघांनी सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. सलामीच्या लढतीत यजमान भारताने श्रीलंकेवर ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध आपली सलामीची लढत गमावली आहे. पाकिस्तानचा संघ या सामन्यात ७ विकेटने पराभूत झाला आहे. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानचा संघ संघर्ष करत असल्याचे या सामन्यातून दिसून आले. त्यामुळे भारताविरुद्धच्या लढतीत पाकिस्तानच्या संघाची कसोटी लागणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
शनिवारपर्यंत झालेल्या लढतींत भारताचा संघ चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारताला विजयासोबतच नेट रन रेट सुधारण्याची संधी आहे. त्याला फायदा भारताला गटातील सामने संपल्यानंतर होऊ शकतो.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणारा भारताचा महिला संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत १२४ धावांर ६ फलंदाज बाद अशी बिकट स्थिती असतानाही तळातील फळीने शानदार फलंदाजी करत २५० पेक्षा अधिक धावांचे आव्हान दिले.