भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

महिलांच्या टी-२० विश्वचषकाची गटवारी आणि वेळापत्रक जाहीर, बांगलादेशमध्ये ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान १० संघांत रंगणार स्पर्धा
महिला टी-२० विश्वचषक
महिला टी-२० विश्वचषकमहिला टी-२० विश्वचषक

दुबई : महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या बलाढ्य संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक तसेच गटवारी रविवारी जाहीर करण्यात आली.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि बांगलादेशची कौर निगर सुल्ताना यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले. सध्या भारतीय संघ बांगलादेशमध्ये टी-२० मालिका खेळत आहे. उभय संघांतील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

दरम्यान २००९मध्ये सुरुवात झालेल्या महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे यंदा नववे पर्व असेल. २०२३मध्ये झालेल्या अखेरच्या टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव पत्करावा लागला होता. आता हे संघ साखळीतच आमनेसामने येतील. ढाका आणि सिल्हेट या दोन ठिकाणी सामने खेळवण्यात येणार असून स्पर्धेत यंदाही १० संघांचा समावेश असेल. भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि पात्रता फेरीद्वारे आगेकूच करणारा संघ अ-गटात असेल. ब-गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि पात्रता फेरीतील दुसरा संघ असे अन्य ५ संघ असतील.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ४ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध सलामीची लढत खेळेल. मग ६ ऑक्टोबरला त्यांची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडेल. भारताचे सर्व सामने हे सिल्हेट येथे होतील. १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचे सामने होतील, तर २० तारखेला अंतिम लढत रंगेल. बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.

स्पर्धेविषयी महत्त्वाचे

* १९ दिवस, २३ सामने, १० संघ.

* प्रत्येक गटात ५ संघांचा समावेश असून एका संघाला ४ सामने खेळावे लागतील.

* गटातील आघाडीचे दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

* पात्रता फेरीद्वारे आयर्लंड, श्रीलंका, स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यापैकी दोन संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

* भारताने अद्याप एकदाही टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. २०२०मध्ये भारताने अंतिम फेरी गाठली होती.

* ऑस्ट्रेलियाने तब्बल ६, तर इंग्लंड व वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा विश्वचषक उंचावला आहे.

भारताचे सामने

४ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड

६ ऑक्टोबर वि. पाकिस्तान

९ ऑक्टोबर वि. पात्र संघ

१३ ऑक्टोबर वि. ऑस्ट्रेलिया

logo
marathi.freepressjournal.in