आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेचा थरारक अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार असला तरी, नवी मुंबईतील मुसळधार पावसामुळे सध्या चाहत्यांची उत्सुकता प्रतीक्षेत बदलली आहे. रविवारचा नियोजित हा सामना हवामानाच्या अडथळ्यामुळे वेळेवर सुरू होऊ शकला नाही.
दोन्ही संघासाठी शर्थीची लढत
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली, तर भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवून फायनल गाठली. दोन्ही संघ पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येत आहेत. त्यामुळे आजचा सामना फक्त विजेतेपदासाठी नव्हे, तर इतिहास घडवण्यासाठी दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.
पण, हवामानाने या रोमांचक लढतीत अडथळा आणला आहे. नवी मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मैदान ओलं झालं असून नाणेफेक दुपारी २:३० वाजता होणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही संघ मैदानावर पोहोचले असले तरी खेळ सुरू होण्याची शक्यता अद्यापही अनिश्चित आहे.
आज सामना झाला नाही तर...
आयोजकांनी अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस म्हणजे सोमवार ठेवला आहे. जर रविवारी सामना पूर्ण खेळवता आला नाही, तर सोमवारी तो पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारीही नवी मुंबईत पावसाची शक्यता कायम आहे.
जर राखीव दिवशीदेखील सामना पूर्ण खेळवता आला नाही, तर दोन्ही संघांना विश्वविजेतेपद संयुक्तरीत्या देण्यात येईल. म्हणजेच भारत आणि दक्षिण आफ्रिका दोघांनाही पहिल्यांदाच ‘संयुक्त विजेता’ म्हणून ट्रॉफी उचलण्याची संधी मिळू शकते.
चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर पाऊस ओसरला आणि खेळाला सुरुवात झाली, तर नक्कीच हे महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय अंतिम सामन्यांपैकी एक ठरू शकतो.