गोलंदाजी प्रशिक्षकासाठी वेगवान त्रिकुटात चुरस! नवा मुख्य प्रशिक्षक गंभीरकडून झहीर, बालाजी आणि विनय यांचा प्रस्ताव

भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक कोण असावा, यासंबंधी गंभीरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) तीन नावे सुपुर्द केली असल्याचे समजते.
गोलंदाजी प्रशिक्षकासाठी वेगवान त्रिकुटात चुरस! नवा मुख्य प्रशिक्षक गंभीरकडून झहीर, बालाजी आणि विनय यांचा प्रस्ताव
Social Media
Published on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यावर लगेचच गौतम गंभीरने कामाला दणक्यात सुरुवात केली आहे. भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक कोण असावा, यासंबंधी गंभीरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) तीन नावे सुपुर्द केली असल्याचे समजते. त्यानुसार झहीर खान, लक्ष्मीपती बालाजी आणि विनय कुमार या तिघांमध्ये गोलंदाजी प्रशिक्षकासाठी चुरस आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जून महिन्याच्या अखेरीस टी-२० विश्वचषक उंचावला. ११ वर्षांचा आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणून भारताने दुसऱ्यांदी टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षण कारकीर्दीतील ही अखेरची स्पर्धा होती. २०२१पासून भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या द्रविडने करारात वाढ न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे विश्वचषकाच्या सुरुवातीपूर्वीच नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यास प्रारंभ झाला होता. अखेर मंगळवारी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी डिसेंबर २०२७पर्यंत ४२ वर्षीय गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल, असे जाहीर केले. मात्र गंभीरने हे पद स्वीकारण्यापूर्वीच त्याला प्रशिक्षकीय चमूतील अन्य सदस्य निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता झहीर, बालाजी व विनय या तिघांपैकी एकाची निवड होऊ शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनीच नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

“झहीर, विनय व बालाजी या तिघांची नावे गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी शर्यतीत आहेत. त्यातही विनयसाठी गंभीरची अधिक पसंती असल्याचे समजते. निवड समिती आणि क्रिकेट सल्लागार समिती पुढील काही दिवसांत यासाठी मुलाखती घेऊन योग्य व्यक्तीची निवड करतील,” असे बीसीसीआयचा पदाधिकारी म्हणाला.

क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी टी. दिलीप यांनाच कायम राखण्यात येणार असल्याचे समजते. त्यांच्याशिवाय अद्याप तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नाही. टी. दिलीप हे २०२३चा एकदिवसीय विश्वचषक तसेच २०२४च्या टी-२० विश्वचषकात भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला पदक देऊन गौरवण्याची प्रथा सुरू केली. भारतीय संघ जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून तोपर्यंत संपूर्ण प्रशिक्षकांची फळी तयार असेल.

तीन पर्यांयाविषयी थोडक्यात

> ४० वर्षीय विनयने भारतासाठी १ कसोटी, ३१ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळले. विनयच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने २०१३-१४, २०१४-१५ या सलग दोन वर्षांत रणजी चषकाचे जेतेपद मिळवले.

> ४५ वर्षीय झहीरने ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्याच्या नावावर ५००पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय बळी आहेत. झहीरला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससह गोलंदाजी प्रशिक्षणाचा अनुभव आहे.

> ४२ वर्षीय बालाजी भारतासाठी ८ कसोटी, ३० एकदिवसीय व ५ टी-२० सामने खेळला. सध्या तो तामिळनाडू रणजी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसेच आयपीएलमध्ये त्याने चेन्नई, कोलकाता संघाला प्रशिक्षण दिले आहे.

अभिषेक नायर फलंदाजी प्रशिक्षक?

गंभीर हा यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता संघाचा मार्गदर्शक होता. त्यामुळे कोलकाताचा फलंदाजी प्रशिक्षक तसेच त्यांच्या अकादमीचा प्रमुख असलेल्या अभिषेक नायरशी त्याचे सूर चांगले जुळतात. मुंबईकर अभिषेकलाच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आणण्याची इच्छा गंभीरने व्यक्त केली आहे. ४० वर्षीय अभिषेक भारताकडून फक्त ३ एकदिवसीय सामने खेळला. मात्र प्रशिक्षक म्हणून त्याने नाव कमावले आहे. तसेच तो अनेक खेळाडूंचा वैयक्तिक मार्गदर्शक म्हणूनही काम करतो. तसेच भारताचा कर्णधार रोहितचा तो फार पूर्वीपासून मित्र आहे.

बुमरा, स्मृती महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

दुबई : आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अनुभवी डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना या भारतीयांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जून महिन्यातील अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद भारताला मिळवून देण्यात बुमराने मोलाची भूमिका बजावली. तोच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. बुमराने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा फलंदाज रहमनुल्ला गुरबाझ यांच्यावर सरशी साधली. दुसरीकडे स्मृतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन शतके, तसेच कसोटी सामन्यातही शतक साकारले.

logo
marathi.freepressjournal.in