अंबरनाथ हादरले! भररस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; CCTV मध्ये थरारक घटना कैद

रविवारी संध्याकाळी सुधीर आपली बाईक दुरुस्त करण्यासाठी जवळच्या वेल्डिंग दुकानात गेला होता. त्याचवेळी ८ ते ९ जण बाईकवर आले आणि त्यांनी सुधीरवर तलवार आणि कोयत्याने भयानक हल्ला केला.
अंबरनाथ हादरले! भररस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; CCTV मध्ये थरारक घटना कैद
Published on

अंबरनाथच्या जावसई भागात रविवारी (दि. १६) संध्याकाळी धक्कादायक घटना घडली. भररस्त्यात एका टोळीने तरुणावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीररित्या जखमी झाला. हा संपूर्ण थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणाचे नाव सुधीर ओमप्रकाश सिंह असून तो अंबरनाथमधील फुलेनगर वाडी येथे राहतो. रविवारी संध्याकाळी तो आपली बाईक दुरुस्त करण्यासाठी जवळच्या वेल्डिंग दुकानात गेला होता. त्याचवेळी ८ ते ९ जण बाईकवर आले आणि त्यांनी सुधीरवर तलवार आणि कोयत्याने भयानक हल्ला केला. या हल्ल्यात सुधीरच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या. हल्लेखोरांनी केवळ सुधीरवरच नव्हे, तर त्याच्या बाईकचेही नुकसान करत तेथून धूम ठोकली.

घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ सुधीरला उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.

महत्त्वाचे धागेदोरे

प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यामागे काही वैयक्तिक वाद असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप स्पष्ट कारण समजले नाही. हल्लेखोरांचे चेहरे आणि हालचाली स्पष्ट दिसणारे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसाठी महत्त्वाचे धागेदोरे ठरत आहेत. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आले आहेत. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींची ओळख आणि हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in