महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाणे जिल्ह्यातील पडघा परिसरात दहशतविरोधी कारवाई करत काही ठिकाणी छापेमारी केली. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये बंदी घातलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा माजी सदस्य साकिब नाचन याच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे.
दहशतवादी प्रकरणांमध्ये आधीच दोषी
साकिब नाचन याचे नाव २००२-०३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व मुलुंडमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये समोर आले होते. त्यामध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. त्याने २०१७ पर्यंत तुरुंगवास भोगला. शिक्षा पूर्ण केल्यानंतर काही काळ तो समाजात शांतपणे राहात होता. मात्र, अलीकडे त्याच्या हालचाली पुन्हा संशयास्पद वाटू लागल्याने एटीएसने तपास सुरु केला.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, साकिब नाचन याच्यावर पुन्हा कट्टरपंथी विचारसरणीकडे वळल्याचा संशय आहे. त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, त्याचे सोशल नेटवर्किंग व्यवहार, आर्थिक व्यवहार, आणि डिजिटल संवाद यांची बारकाईने चौकशी केली जात आहे. त्याच्या पुन: सक्रीय होण्याची शक्यता पाहता, ही कारवाई धोका टाळण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.
परिसरात तणाव; सुरक्षेसाठी बंदोबस्त
या कारवाईमुळे पडघा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पोलिस व सुरक्षा पथकांनी परिसरात भक्कम बंदोबस्त तैनात केला. नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असले तरी, एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
तपास सुरूच; आणखी काही जणांच्या चौकशीची शक्यता
एटीएस पथक तांत्रिक पुरावे, दस्तऐवज आणि डिजिटल डिव्हाइसेसची तपासणी करत असून, आणखी काही व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षेचे यंत्रणा सज्ज असल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.