

भिवंडी : मुंबईला मित्रासोबत जाणाऱ्या भिवंडीतील १७ वर्षीय मोहम्मद फाजील अन्सारी याचा धावत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी कळवा रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. फाजील हा भिवंडीतील बाला कंपाऊंड परिसरातील रहिवासी होता. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फाजील शुक्रवारी मित्रासोबत मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला होता. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास त्याने कल्याण-मुंबई लोकल पकडली. लोकल कळवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोहोचली असता फाजील डब्याच्या दरवाजाजवळ उभा होता. त्याचवेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्राने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने जखमी फाजीलला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
फाजील हा आई-वडिलांचा मोठा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूची बातमी बाला कंपाऊंड परिसरात समजताच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. रेल्वे पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. त्यानंतर पांजरापोळ स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.