महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदा गुटखा व्यवसायाविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचे परिणाम आता भिवंडीत दिसू लागले आहेत. राज्यातील गुटखा पुरवठ्याचे महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या भिवंडीत गुटखा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक पानटपऱ्यांवर ग्राहकांनी गुटखा किंवा पान मसाला मागू नये, असे फलक लावण्यात आले आहेत.
भिवंडीवर विशेष लक्ष
महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित पान मसाल्यावर बंदी असतानाही अनेक वर्षांपासून त्याचा बेकायदा व्यापार सुरू असल्याचे समोर येत आहे. FDA ने अलीकडेच उत्पादन, वाहतूक, साठवण आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले भिवंडी शहर गोदामे आणि लॉजिस्टिक नेटवर्कसाठीही ओळखले जाते. त्यामुळे गुटख्याच्या साठवणुकीसाठी आणि राज्यभर पुरवठ्यासाठी या शहराचा वापर होत असल्याचा संशय यंत्रणांना आहे.
मुंढेंचा दणका, पुरवठा साखळीवर दबाव
यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त झाला असला तरी कारवाई प्रामुख्याने चालक, वाहतूकदार किंवा तळागाळातील संबंधितांपुरतीच मर्यादित राहत होती. मात्र तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यावर भर दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे या व्यवसायाशी संबंधित अनेक जण सावध झाले असून काहींनी आपले व्यवहार कमी केल्याची चर्चा आहे. गुटखा तस्करीत सहभागी असलेल्या नेटवर्कमध्येही अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे.
पानटपऱ्यांवर इशाऱ्याचे फलक
या कारवाईचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. भिवंडीतील अनेक पानटपऱ्यांवर "कृपया गुटखा किंवा पान मसाला मागू नका" असे फलक झळकत आहेत. दुकानदारही सध्या कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे सांगत ग्राहकांना अशा उत्पादनांची मागणी करू नये, असे आवाहन करत आहेत.
नागरिकांकडून स्वागत
नागरिक आणि तंबाखूविरोधी कार्यकर्त्यांनी या मोहिमेचे स्वागत केले असून बेकायदा गुटखा व्यापारावर कायमस्वरूपी आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. FDA ची कारवाई याच वेगाने सुरू राहिल्यास भिवंडीतील गुटखा साखळीला मोठा फटका बसू शकतो, असे मतही व्यक्त केले जात आहे.