भिवंडीत प्रचाराला हिंसक वळण; भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, २ जण जखमी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

शनिवारी काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली भिवंडी परिसरात आली होती तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोरून जात घोषणाबाजी केली आणि...
भिवंडीत प्रचाराला हिंसक वळण; भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, २ जण जखमी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
Published on

भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे . अशातच, शनिवारी (दि.३) संध्याकाळी नारपोली भंडारी चौक परिसरात प्रभाग क्रमांक २० याठिकाणी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंनी लाठ्या-काठ्या आणि दगडांचा मारा झाल्याने दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी साडेसातच्यादरम्यान घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नारपोली व भोईवाडा पोलीस ठाण्याच्या मोठ्या पोलिस फौजफाट्याला घटनास्थळी बोलवण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, दोन्ही बाजूंनी प्लास्टिकच्या खुर्च्या, लाठ्या-काठ्या तसेच दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक केल्याचा आरोप भाजप उमेदवार यशवंत टावरे यांनी केला आहे.

काँग्रेसच्या घोषणांनंतर भाजप कार्यकर्त्यांचा संताप

नारपोली भंडारी चौकातील वॉर्ड क्रमांक २० मध्ये भाजप उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांची कार्यालये रस्त्यालगत आहेत. शनिवारी काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली या परिसरात आली होती तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोरून जात घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि पुढे त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले, अशी माहिती समोर आली आहे.

भाजपने महिलांवर हल्ला केल्याचा काँग्रेसचा आरोप

काँग्रेसकडूनही भाजप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेस नगरसेविका वैशाली म्हात्रे यांची मुलगी हर्षाली म्हात्रे यांनी सांगितले की, “आम्ही उमेदवाराची प्रचार रॅली काढून डोअर-टू-डोअर प्रचार करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला त्या परिसरात जाण्यापासून रोखले. त्यानंतर महिलांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला.”

हर्षाली म्हात्रे यांनी पुढे आरोप करत सांगितले की, “२०१७ मध्ये माझ्या वडिलांची हत्या झाली होती. आता उमेदवार असलेल्या माझ्या आईवर हल्ला करण्यात आला असून काँग्रेस कार्यालयावरही खुर्च्या आणि दगडफेक करण्यात आली.”

या घटनेनंतर परिसरात तणाव कायम असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in