Badlapur Crime : ३ वर्षांनंतर सत्य उघडकीस; पतीनेच रचला महिला काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या हत्येचा डाव

बदलापूरमधील काँग्रेस नेत्या नीरजा आंबेकर यांचा २०२२ मधील मृत्यू नैसर्गिक नसून सर्पदंशातून करण्यात आलेली नियोजित हत्या असल्याचा धक्कादायक खुलासा तिच्या पतीनेच केला आहे. या घटनेचा पुढील तपास सध्या सुरु आहे.
Badlapur Crime : ३ वर्षांनंतर सत्य उघडकीस; पतीनेच रचला महिला काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या हत्येचा डाव
Badlapur Crime : ३ वर्षांनंतर सत्य उघडकीस; पतीनेच रचला महिला काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या हत्येचा डाव
Published on

सध्या गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत असून आता बदलापूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या नीरजा आंबेकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा तीन वर्षांनंतर उलगडा झाला आहे. २०२२ मध्ये नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद झालेला हा प्रकार प्रत्यक्षात मात्र नियोजित हत्या असल्याचे समोर आले आहे. ही हत्या त्यांच्या पतीनेच केल्याचा आरोप पोलिस तपासात उघड झाला आहे.

चौकशीतून उलगडले गूढ

निवडणूक काळात बदलापूरमध्ये घडलेल्या एका वेगळ्या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋषिकेश चाळके याला अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान त्याने केलेल्या कबुलीजबाबामुळे नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूमागील सत्य समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, चाळके याने कबुली दिली की नीरजा आंबेकर यांची हत्या त्यांचे पती रुपेश आंबेकर यांनी तीन साथीदारांच्या मदतीने केली. या प्रकरणात चेतन दूधाणे, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. ही हत्या सर्पदंशामुळे झाली असे भासवण्यासाठी नियोजन कट रचण्यात आला होता, अशी माहिती तपासादरम्यान समोर आले आहे.

असा रचला होता कट

आरोपींनी विषारी साप एका गोणीत आणून आंबेकर यांच्या घरातील स्वयंपाकघरात लपवून ठेवला होता. नीरजा आंबेकर यांच्या पायांना मसाज करण्याच्या बहाण्याने त्यांना हॉलमध्ये झोपवण्यात आले. त्यानंतर ‘सर्पमित्र’ म्हणून ओळख असलेल्या चेतन दूधाणे याने साप बाहेर काढून तो चाळकेकडे दिला. त्या सापाकडून नीरजा आंबेकर यांच्या डाव्या घोट्याजवळ तीन वेळा दंश करवून घेण्यात आल्याचा आरोप आहे. या सर्पदंशामुळे त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर हा प्रकार अचानक सर्पदंश झाल्याने घडला असे भासवण्यात आले. त्यावेळी केवळ अपघाती मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली होती. त्यामुळे कोणताही संशय न येता आरोपी जवळपास तीन वर्षे कायद्याच्या कचाट्यातून सुटले होते.

आरोपी अटकेत; डॉक्टरांचीही चौकशी होणार

चाळकेच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली. या प्रकरणात रुपेश आंबेकर, चेतन दूधाणे, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके यांना अटक केली आहे. या हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांकडून या हत्येमागील नेमका हेतू शोधण्याचे तसेच अन्य ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसेच त्या वेळी मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे बदलापूरसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in